लोणावळा : प्रतिनिधी
वर्षाविहाराचा आनंद घेण्याकरता रविवारी (दि. 7) लोणावळ्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर आठ ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत तर भूशी धरणाकडे जाणार्या मार्गावर सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रविवारची सुट्टी एन्जॉय करण्याकरिता सकाळपासूनच लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाल्याने दुपारी बारा वाजता भुशी धरण ते कुमार चौक अशी सुमारे सात किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. राष्ट्रीय महामार्गावर तर सकाळपासूनच वाहनांची गर्दी झाल्याने खंडाळा ते लोणावळा व लोणावळा ते वलवण दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. भुशी धरण व लायन्स पॉइंट या पर्यटन स्थळांवर अक्षरशः पाय ठेवण्यास देखील जागा शिल्लक राहिली नव्हती. वाहनांमधून येणार्या पर्यटकांप्रमाणेच रेल्वेगाड्यांना येणार्या पर्यटकांची संख्या देखील मोठी असल्याने भुशी धरण ते लोणावळा रेल्वे स्थानकादरम्यान पायी पर्यटकांच्या रांगा लागल्या होत्या. पर्यटनस्थळांवर व राष्ट्रीय महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आ. पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, पोलीस उपनिरीक्षक बजरंग सांगडे, राधिका मुंडे, मृगदीप गायकवाड यांच्यासह वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी, वॉर्डन, पोलिस मित्र व मुख्यालयाकडून आलेले पोलिस कर्मचारी असा सुमारे सव्वाशे पोलिसांचा ताफा रस्त्यावर तैनात होता. लोणावळा शहरात प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने सर्वत्र वाहने व वाहतुक कोंडी असेच चित्र पहायला मिळत होते. स्थानिक नागरिकांना अक्षरशः घरातून बाहेर पडणे अवघड झाले होते. लोणावळा खंडाळा परिसरातील भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, गिधाड तलाव, राजमाची गार्डन, डयुक्स नोज सनसेट पाँईट, यासह कार्ला लेणी, भाजे लेणी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.