Breaking News

भाजपच्या तीव्र विरोधानंतर ठाकरे सरकारला उपरती

शिवजयंतीसाठी नवी नियमावली जाहीर

मुंबई ः प्रतिनिधी
संपूर्ण राज्यभरात 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन करीत राज्य सरकारने काही निर्बंध घालत गुरुवारी (दि. 11)
शिवजयंतीसाठी नियमावली जारी केली होती. त्यावरून भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधल्यानंतर राज्य सरकारने एक पाऊल मागे टाकत शुक्रवारी (दि. 12) नव्याने नियमावली जाहीर केली. त्यानुसार आधी फक्त 10 जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली होती, पण आता 100 जणांना परवानगी देण्यात आली आहे.
सत्तेसाठी शिवसेनेने अनेकदा काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे लोटांगण घातले. आता शिवजयंती साजरी करण्यावर बंधने घालून शिवसेनेने ‘घालीन लोटांगण, वंदीन चरण’चा नवा प्रयोग सादर केला. ‘हिंदू समाज सडा हुवा है’ म्हणणार्‍या शरजील व एल्गार परिषदेच्या कार्यक्रमाला ठाकरे सरकारकडून पायघड्या अंथरल्या जातात, मात्र छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करायला राज्य सरकार बंधने घालते. पोवाडे, बाइक रॅली, मिरवणुकांवर सरकारने अनेक निर्बंध घातलेत. दारूची दुकाने, नाइट लाइफ, बार सुरू करण्यास परवानगी देताना सरकार गर्दीचा विचार करीत नाही, परंतु शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात कोरोनाच्या नावाखाली अनेक अडचणी सांगितल्या जात आहेत, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली होती.
भाजपच्या दणक्यानंतर आता ठाकरे सरकारने शिवजयंतीसाठी नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. अनेक शिवप्रेमी किल्ले शिवनेरी अथवा गडकिल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार 18 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजताही एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात, परंतु यंदा मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.
दरवर्षी शिवजयंतीला महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, परंतु यंदा सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक आदींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाइक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply