Breaking News

गोराई-बोरिवली, मालाड-मार्वे रोपवे प्रकल्प

शक्यता तपासणीसाठी कंपनीची नियुक्ती

मुंबई : प्रतिनिधी  – मुंबईतील मेट्रो प्रकल्पांची स्थानकांवर मल्टी मॉडल इंटिग्रेशन प्रकल्प राबविणे, तसेच गोराई ते बोरिवली व मालाड ते मार्वे या मार्गावर रोपवे वाहतुकीसाठी विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करण्यास मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीस मंजुरी देण्यात आली. सोमवारी (दि. 8) सह्याद्री अतिथीगृहात प्राधिकरणाची 148वी बैठक झाली.

मालाड ते मार्वे आणि गोराई ते बोरिवली या दोन्ही 4.5 कि.मी. लांबीच्या अंतरासाठी रोपवे प्रकल्प कितपत शक्य आहे हे पाहण्यासाठी मे. इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लि. यांची विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नेमणूक करण्यात आली. या प्रकल्पांमुळे पूर्व पश्चिम जोडणी निर्माण करता येणार आहे. तसेच मालाड मेट्रो स्टेशन, मार्वे, बोरिवली रेल्वे स्थानक, मेट्रो-2अ आणि गोराई जेटीपर्यंत पोहोचता येणार आहे. यावेळी मुंबईतील विविध मेट्रो स्थानकाच्या ठिकाणी बहुवाहतूक परिवहन एकत्रिकरण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी तीन हजार 500 हजार कोटी मंजूर करण्यात आले. या प्रकल्पामुळे मेट्रो स्थानकाच्या परिसरात पादचारी मार्गांचे रूंदीकरण, सायकल मार्ग, वाहनतळ परिसर, रहदारी सिग्नल सुधारणा, रस्त्यावरील दिवे, सीसीटीव्ही कॅमेरा, स्थळदर्शक नकाशे, मेट्रो स्थानकापासून ये-जा करणार्‍या बस सेवा, इतर पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण इत्यादी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अंतिम स्थानकापर्यंत सुविधा मिळणार आहे. याबरोबरच सर्व मेट्रो मार्गांखालील रस्त्यांचा विकासही या प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे.

सूर्या धरण प्रकल्पांतर्गत कवडास बंधार्‍याचे बांधकाम करण्यासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाला अर्थसहाय्य देण्याचा निर्णयदेखील यावेळी घेण्यात आला. प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘जी’ ब्लॉकमधील सी-65 हा भूखंड मे. गोईसू रियालीटी प्रा.लि. या जपानी कंपनीला दोन हजार 238 कोटी भाडेपट्टीवर 80 वर्षासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. 12 हजार 486 चौ.मी. भूखंडावर 65 हजार चौ.मी. बांधकाम करण्याची कंपनीला परवानगी देण्यात येणार आहे.

मेट्रो प्रणाली उभारणे म्हणजे केवळ एका जागेहून दुसर्‍या ठिकाणी पोहचविणारी व्यवस्था नाही. प्रवाशांसाठी ही प्रणाली पूर्णपणे समाधान देणारी असायला हवी. थोडक्यात, केवळ प्रवास करण्यासाठी नव्हे, तर समाधानकारक प्रवास करण्यासाठी प्रवाशांना उद्युक्त करणारी प्रणाली उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी मेट्रोमधून उतरल्यानंतर गंतव्य स्थानी पोहोचण्यासाठी योग्य त्या सर्व सुविधा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे मोनो रेल्वेच्या फेर्‍या वाढविल्यास प्रवाशांची संख्या वाढण्यास मदत होईल. त्यादृष्टीने नियोजन करावे.

-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply