पेण : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या वतीने सामाजिक जाणिवेतून वर्षभरात 75 उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ महाविद्यालयात करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून असीम फाउंडेशन पुणे येथील सारंग गोसावी, प्रमुख अतिथी म्हणून सोबती संस्थेचे अध्यक्ष अॅड. बापूसाहेब नेने व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. मंगेश नेने हे उपस्थित होते.
या वेळी अॅड. बापूसाहेब नेने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व योगेश निखारे यांनी बनविलेल्या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण सारंग गोसावी यांच्या हस्ते करून शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य सदानंद धारप यांनी संस्थेच्या उपक्रमाविषयी माहिती देऊन पुढील उपक्रम कशाप्रकारे राबविणार याविषयी माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात मंगेश नेने यांनी या उपक्रमात संस्थेच्या वतीने दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली.
प्रमुख पाहुणे सारंग गोसावी यांनी आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून यापुढेही आपल्या उपक्रमात एक भाग असीम फाउंडेशनचा असेल असा शब्द त्यांनी दिला. या वेळी पहिला उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी पुस्तकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष वसंत आठवले, उपकार्याध्यक्ष संजय कडू, मानद सचिव प्रशांत ओक, योगेश निखारे, समीर साने, किरण देव, अश्विनी गाडगीळ आदींसह मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.