भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन आता प्रचंड आशावादी होत असल्याचे जागतिक चित्र आहे. याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धडाडीच्या नेतृत्वाला आणि डोळस निर्णयशक्तीला द्यायला हवे. अर्थात विरोधकांना हे पटणार नाही. देशात जे वाईट घडते त्याचीच चर्चा सुरू ठेवणे त्यांना सोयीचे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी ठाण्यामध्ये एका कार्यक्रमात भारताबाबत नकारात्मक दृष्टिकोन ठेवणार्यांवर थोडे शाब्दिक उपचार केले.
सौंदर्य हे बघणार्याच्या दृष्टीतच असावे लागते, अशा आशयाचे एक वचन इंग्रजी भाषेत आहे. दिसतो तो चेहरा सुंदर असतोच असे नाही, पण बघणार्याला त्यातील सौंदर्य दिसून येते, फक्त ती सौंदर्यदृष्टी त्याच्याठायी हवी. दुर्दैवाने काही लोकांना चांगले घडलेले दिसतच नाही. जिथे-तिथे त्यांना फक्त नको तेच दिसते. असा नकारात्मक दृष्टिकोन व्यक्तीच्या किंवा समाजाच्या प्रगतीला बाधक ठरतो. अनेक शतकांपासून आपल्या देशाकडे बघण्याचा पाश्चात्य राष्ट्रांचा दृष्टिकोन असाच रोगट राहिला होता. भारत देश म्हटले की अडाणीपणा, अंधश्रद्धा, रोगराई आणि अस्वच्छता यांचेच चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहात असे. कालांतराने साधू, बैरागी, गारुड्याचे खेळ आणि जादू यांची त्यात भर पडली, परंतु तेव्हाही आपला देश जगातल्या मागास आणि कायम दबावात असलेल्या राष्ट्रांपैकी एक म्हणून ओळखला जात असे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना भारताबाबतची ती आंतरराष्ट्रीय प्रतिमा आता भराभरा बदलू लागली आहे. अशावेळी सदोदित नकारघंटा वाजवणार्या विरोधकांना कडू औषध पाजताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलेले विचार मनोज्ञ आहेत. ठाणे येथील बाळकुम भागात महापालिकेच्या ग्लोबल इमारतीच्या परिसरात धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय उभे राहात आहे. त्यासोबत भव्य त्रिमंदिर संकुल अल्पावधीतच उभे राहणार आहे. या दोन्ही उपक्रमांचे भूमीपूजन सरसंघचालकांच्या हस्ते झाले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सक्रीय पाठबळ आहे. ठाणे जिल्ह्याच्या परिसरात सामान्यजनांना परवडणारे कर्करोग रुग्णालय उभे राहणे नितांत आवश्यक होते. या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आवर्जून उपस्थित राहिले होते. यावरूनच या उपक्रमाची महती कळायला हवी. या वेळी बोलताना सरसंघचालक भागवत म्हणाले की देशात जे वाईट घडते त्याचीच चर्चा अधिक होते, परंतु पूर्वीपेक्षा 40 पट वेगाने चांगली कामे देशात सुरू आहेत हे कोणी लक्षात घेत नाही. अनेक जण नि:स्वार्थ भावनेतून चांगले काम करीत आहेत. लाभाची अपेक्षा नसेल तरच चांगले काम होते. कार्य हे संवेदनेतूनच व्हायला हवे असे सरसंघचालक म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्करोग रुग्णालयाचा प्रकल्प हाती घेतानाच आपले गुरू धर्मवीर आनंद दिघे यांचे ऋणदेखील काही अंशी फेडले. कारण हा प्रकल्प दिघे यांच्या नावानेच सुरू होत आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी जैन समाजाने सढळ हस्ते मदत केली आहे. जैन समाजाच्या श्रमातून आणि मेहनतीतूनच हे प्रकल्प साकार होत आहेत. केवळ पैसा कमवायचा नाही तर तो सेवेसाठी खर्च करायचा असतो हे तत्त्व जैन समाजात पाळले जाते अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी कृतज्ञता व्यक्त केली. चांगल्या घडणार्या कामाची नोंद इतिहासाला घ्यावीच लागते याचे उदाहरण म्हणून या प्रकल्पांकडे पाहायला हवे.