मुंबई : प्रतिनिधी
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या अनपेक्षित पराभवाने भारताची मोहीम संपुष्टात आली. यासह जगभरातील अब्जावधी क्रिकेट चाहत्यांचाही हिरमोड झाला, पण भारताने यंदाच्या स्पर्धेत छाप पाडली. टीम इंडियाच्या खेळाडूंनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावताच रोहित शर्मा विश्वक्रिकेटमध्ये मानाच्या पंक्तीत पोहोचला. सलग तीन सामन्यांत शतके झळकाविणार्या खेळाडूंमध्ये त्याची नोंद झाली. त्याच्याआधी अशी कामगिरी 10 फलंदाजांनी केली होती. तो केवळ दुसराच भारतीय फलंदाज ठरला. विराट कोहलीने 2018मध्ये वेस्ट इंडिज दौर्यात अशी कामगिरी केली होती. शिवाय एकाच विश्वचषकात सर्वाधिक पाच शतके झळकावताना रोहितने श्रीलंकेच्या कुमार संगाकाराचा विश्वविक्रमही मोडीत काढला.
भारत वि. पाकिस्तान या ‘हाय व्होल्टेज’ सामन्याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले होते. विश्वचषकात हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आतापर्यंत सात वेळा आमनेसामने आले आणि त्यात प्रत्येक वेळी भारतानेच विजय मिळवला. यंदाही त्याची पुनरावृत्ती झाली. भारताने 89 धावांनी मिळवलेला विजय स्पर्धेत पाकविरुद्ध आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला.
पाकिस्तानविरुद्ध भारतीय कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक झळकावत एकदिवसीय सामन्यात 11 हजार धावा पूर्ण करताना सचिन तेंडुलकरचा 17 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. विराटने 222 डावांत ही कामगिरी केली. सचिनने 2002मध्ये इंग्लंडविरुद्ध कानपूरमध्ये ही कामगिरी केली होती. यासाठी त्याला 276 डाव खेळावे लागले होते. 11 हजार धावा करणारा विराट तिसरा भारतीय, तर क्रिकेटविश्वातील नाववा फलंदाज ठरला. सौरव गांगुलीनेही अशी कामगिरी केली आहे.
विराटने साखळी फेरीतील श्रीलंकेविरुद्ध विश्वचषकात एक हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा जगातील विसावा आणि भारताचा तिसरा फलंदाज ठरला. त्याच्या आधी अशी कामगिरी सचिन तेंडुलकर (2278 धावा) आणि सौरव गांगुली (1006 धावा) यांनीच केली होती. विराटने 25 डावात 1029 धावा केल्या. विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतक झळकावले. यासह त्याने सचिन तेंडुलकर आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्या विक्रमाची बरोबरी केली. विश्वचषक स्पर्धेत त्याने सलग चार सामन्यांत भारताकडून 50पेक्षा जास्त धावा त्याने केल्या. शिवाय अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरला. अफगाणिस्तानविरुद्ध हॅट्ट्रिक घेऊन शमीने भारताला विजयी केले. विश्वचषकात अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरला. याआधी चेतन शर्माने 1987 साली न्यूझीलंडविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती.