Breaking News

मृत कोंबड्यांचे मांस उघड्यावर टाकल्याने महड देवस्थान परिसरात दुर्गंधी

खालापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील वरदविनायक देवस्थानच्या हद्दीत पाताळगंगा नदीकिनारी मृत पक्ष्यांचे मांस उघड्यावर टाकल्याने परिसरात दुर्गंधी येत असल्याची तक्रार महड ग्रामस्थांनी खालापूर तहसीलदार व नगरपंचायतीकडे केली आहे. बर्ड फ्लूचा संभाव्य धोका लक्षात घेता खालापुरातील शासकीय यंत्रणा सतर्क झाली असून महड ग्रामस्थांची तक्रार येताच तलाठी रंजीत कवडे व त्यांचे सहकारी सुरेश ठोंबरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या ठिकाणी दोन ते तीन टन मृत कोंबड्यांचे मांस पडले होते. त्याचा पंचनामा करून तलाठी रंजीत कवडे यांनी खालापूर तहसील कार्यालयाला माहिती दिली. खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे व पदाधिकार्‍यांनी घटनास्थळाला भेट दिली असता परिसरात दुर्गंधी पसरल्याचे त्यांना जाणवले. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून संबंधित अज्ञात इसमावर कारवाई करण्याचे संकेत मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी दिले आहेत. दरम्यान, खालापूर तालुक्यात कुक्कुटपालनाचा  व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून यातील काही व्यावसायिकांनी आपल्या पोल्ट्री शेडमधील कोंबड्याचे टाकाऊ अवयव गोणीत भरून फेकून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply