Breaking News

आग्र्याहून सुटका आणि गीतारहस्य

महाराष्ट्र जाणण्यासाठी मराठी माणसाकडे शिवाजी हे उत्तम साधन आहे. त्याला तो कळला की भारताला त्याचे महत्त्व लक्षात येईल आणि मराठी माणसाची मान देशात उंचावेल. यासंदर्भात अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना घडलेला एक किस्सा सांगण्यासारखा आहे. जनरल परवेज मुशरफ पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख होते आणि ते वाजपेयींशी बोलणी करण्यासाठी भारतात आले होते. चर्चा आग्र्याला होणार होती, पण राजशिष्टाचाराप्रमाणे प्रथम चहापान दिल्लीत राष्ट्रपती भवनात होणार होते. के. नारायणन तेथे विराजमान होते. सुसंवाद सुफलित व्हावा म्हणून त्यांनी उभय पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी दोघांना ते म्हणाले, चर्चा यशस्वी होणारच. कारण तुमचे संकेतस्थळ म्हणजे भेटीचे ठिकाण जेथे आहे तेथून जवळच सम्राट अकबराची कबर आहे. तुम्ही जे बोलाल ते तो मुघल बादशाह कान देऊन ऐकेल आणि दोन्ही देशांचे संबंध सुधारावेत म्हणून त्याची शक्ती तुमची पाठीशी उभी करेल. हे शब्दश: नव्हे पण सारांशाने मी सांगत आहे. त्यावेळी मला हे वाचून आश्चर्य आणि वाईट वाटले. अकबराच्या शुभेच्छा मिळाल्या तर हव्याच होत्या, पण आग्रा म्हटल्यावर भारताच्या राष्ट्रपतींना प्रथम शिवाजी महाराजांची आठवण यायला हवी होती. शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले म्हणून आज आपण जिवंत आणि स्वतंत्र आहोत. ऑगस्ट महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात अकबराचा पणतू औरंगजेब ह्याने त्याच्या बंदिवासात असलेल्या शिवाजीला ठार मारण्याचे ठरविले होते. आदल्या दिवशी महाराज पेटार्‍यातून पळाले आणि सुखरूप राजगडावर पोचले. मिरजाराजे जयसिंग ह्यांचे महाराष्ट्रावरील भीषण आक्रमण, एकामागून एक त्याच्या स्वाधीन करावे लागणारे गड आणि त्यामुळे गहाण पडलेली भारताची अस्मिता आणि सार्वभौमता, त्यातून महाराजांनी आग्र्याला केलेले प्रयाण, भेटीत उडालेला खटका, बंदिवास आणि मृत्यू समोर दिसत असताना शिताफीने केलेली शंभूराजांसह स्वतःची सुटका हा सगळा इतिहास म्हणजे महाराष्ट्र आणि भारत उभयतांचे सोनेरी पान आहे. आदर्श युद्धनीतीचे जसे अफजलखान वध तसे आदर्श राजनीतीचे आग्र्याहून सुटका हे उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक भारतीयाचे ते अखंड स्फूर्तिनिधान आहे. ते के. नारायणन ह्यांना आठवले नाही. वाजपेयींना शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी अकबराला पाचारण करावे ही  परभृत मानसिकता आहे ह्या विचाराने मी खिन्न झालो होतो.

त्यावेळी महाराष्ट्रात मनोहर जोशी आणि उत्तर प्रदेशात कल्याणसिंग मुख्यमंत्री होते. केंद्रात वाजपेयी होते. बाळासाहेब ठाकरे यांना मी आठदहा दिवसातून एकदा प्रत्यक्ष भेटत असे. त्यांच्यासमोर मी संयुक्तपणे साधावयाच्या शिवाजी स्मृतिसंचयाचा प्रस्ताव ठेवला. आग्र्याहून सुटका हे प्रकरण का घडले आणि त्याचे भारताच्या राजकारणावर किती खोलवर परिणाम झाले ह्याचे ध्वनी आणि दृश्य माध्यमातून जिवंत वाटावे असे भव्यतर स्मारक लाल किल्ल्यावर उभे करावयाचे असा तो प्रस्ताव होता. येथून पुढे लोक आग्र्याला केवळ ताजमहाल बघण्यासाठी नव्हे तर शिवाजी महाराजांनी औरंगजेबावर मात कशी केली हे बघण्यासाठी येतील, आग्रा हे नुसते पर्यटनस्थळ नव्हे तर अखिल भारताचे तीर्थस्थळ होईल असे काहीतरी करावयाचे अशी कल्पना होती. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मध्यवर्ती सत्ता यांच्या इच्छाशक्तीच्या त्रिवेणी संगमातून आंतरराष्ट्रीय वैभवाचे साधन ठरावे असे हे स्मारक उभे राहायला हवे होते. बाळासाहेबांना कल्पना आवडली आणि त्यांनी मनापासून तिचा स्वीकार केला. कल्याणसिंग आणि वाजपेयी ह्यांच्याशी बोलतो असे ते म्हणाले. पत्रकार म्हणून जेवढा करता येईल तेवढा पाठपुरावा ह्या कल्पनेचा मी केला. अशा कल्पनांना साकार व्हायला वेळ लागतो. त्यामुळे भविष्यात ती निश्चितपणे समूर्त होईल असे मानून मी वाट पाहण्याचे ठरविले.

आज मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करीत आहे. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून या कल्पनेला चालना द्यावी. मुंबईच्या समुद्रात महाराजांचे स्मारक करण्याची योजना त्यांनी मार्गस्थ केली आहे. भारतीय भावविश्वावर देशभक्तीचा आणि विजिगीषू राजनीतीचा अमिट संस्कार करण्याच्या दृष्टीने हे स्मारक उभे करणे म्हणजे थोर राष्ट्रकार्य होणार आहे. लोकांनीही ही कल्पना उचलून धरायला हवी.

दुसरी कल्पना लोकमान्य टिळकांविषयी आहे. पुढील वर्षी त्यांच्या देहावसनाला शंभर वर्षे पूर्ण होतील. ब्रिटिशांनी राजद्रोहाच्या आरोपाखाली ज्यांना विदेशात किंवा भारतात दुर्गम ठिकाणी बंदिवासात ठेवले अशा मराठी भाषिक व्यक्ती म्हणजे वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर. टिळकांना ब्रह्मदेशात म्हणजे आताच्या म्यानमारमध्ये मंडालेला सहा वर्षांसाठी कारागृहात ठेवले होते. सावरकरांनी अंदमानात कविता केली आणि वाचनसंस्कृतीचा पाठपुरावा केला. टिळकांनी  गीतारहस्य  लिहिले. देशासाठी संपूर्ण समर्पण वृत्तीने आयुष्य वाहून घेणार्‍या पहिल्या पिढीचे अग्रेसर प्रतिनिधी म्हणजे टिळक आणि आगरकर. स्वराज्य हा जन्मसिद्ध अधिकार आहे हे त्यांनीच ठसविले. त्यांनी वर्तमानपत्र का आणि कसे वाचायचे हे शिकवून तरुणांना अस्वस्थ  करून सोडले. त्यांच्या ’केसरी’ साप्ताहिकाच्या गर्जनेचे पडसाद देशभर उमटत असत. टिळक नावाजलेले खगोलशास्त्रज्ञ होते, परंतु मातृभूमीची स्वातंत्र्यप्राप्ती हे त्यांचे पहिले जीवितकार्य होते. क्रियावान पंडित. ब्रिटिशांचे दास्यत्व झुगारून देताना इस्लामी आक्रमकतावादाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि त्यासाठी हिंदू संघटन हा प्रभावी उपाय आहे हे त्यांना मान्य होते. कृष्णाने अर्जुनाला जसे घडविले तशी मानसिकता टिळकांना भारतीयांची घडवायची होती. म्हणून त्यांनी निवांतपणा मिळताच मंडालेच्या कारागृहात गीतारहस्य एकटाकी लिहून काढले. त्यासाठी फ्रेंच आणि जर्मन भाषा ते मुळाक्षरापासून शिकले. त्यांना हवी ती पुस्तके उपलब्ध करून द्या, अशी विनंती इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या जर्मन तत्त्वज्ञाने म्हणजे मॅक्स्मुल्लरने ब्रिटिश राज्यकर्त्यांना केली. तुम्ही गीतारहस्य मराठीत का लिहिले? इंग्रजीत लिहिले असते तर खोर्‍यांनी पैसे आणि कीर्ती मिळविली असती असे कोणीतरी त्यांना म्हणाले तेव्हा इंग्रजांना कर्मयोग कळला आहे म्हणून ते जगावर राज्य करीत आहेत. हिंदूंना अध्यात्माचे अजीर्ण झाले आहे म्हणून ते पारतंत्र्यात आहेत,  असे उत्तर टिळकांनी दिले. मराठी माणसाला श्रीकृष्णाचे तत्त्वज्ञान कळावे म्हणून टिळकांनी मराठीत लिखाण केले. ‘गीतारहस्य’ आणि ‘माझी जन्मठेप’ हे दोन ग्रंथ मराठी माणसाच्या वाचनात लहानपणापासून असले पाहिजेत. सध्या तो ‘श्यामची आई’ वाचून थांबत आहे. त्याने पुढे जायला पाहिजे आणि ज्ञानाधिष्ठित राजकारणाची कास धरली पाहिजे म्हणून गीतारहस्यावर अनेकानेक मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम करता येतील. भारताची स्वातंत्र्य चळवळ आणि गीतारहस्य ह्या विषयावर परिसंवाद घेता येतील. असे कार्यक्रम मुंबई-पुण्यापुरते मर्यादित राहता कामा नयेत. ते राष्ट्रस्तरावर झाले पाहिजेत. त्याला आंतरराष्ट्रीय परिमाणही देता येईल. त्यासाठी ब्रह्मदेश सरकारचे सहकार्य घेता येईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा विषय लावून धरला पाहिजे.

शिवाजी, महादजी, टिळक आणि सावरकर यांच्या चरित्रातील निवडक प्रसंग स्मारकरूपाने लोकांसमोर आणणे हे मानसिक परिवर्तनाच्या दृष्टीने आणि ती विजिगिषू करण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण, प्रबोधन, चित्रकला, वास्तुशास्त्रज्ञ,  मनोरंजनाची कलामाध्यमे अशा अनेक क्षेत्रातील लोकांना या स्मारकाच्या कार्यात जोडता येईल आणि बराच काळ सगळे वातावरण भारलेले आणि संस्मरणीय राहील.

-अरविंद विठ्ठल कुळकर्णी (मो. क्र. 9619436244)

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply