Breaking News

बिबट्याच्या तावडीतून सुटका अन्

जिल्ह्यातील मुरबाड या कर्जत तालुक्याला लागून असलेल्या तालुक्यातील करपटवाडीची ओळख मागील काही दिवसांत जगाला झाली आहे. या वाडीमधील आदिवासी कुटुंबातील चार सदस्यांवर जंगलात बिबट्याने हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यात आपल्या म्हातार्‍या आजीला बिबट्याच्या तावडीतून सोडविण्याचे काम करणार्‍या त्या दोन बालकांना शौर्य पुरस्कार द्यावे, अशी मागणी पुढे येत आहे. कर्जत तालुक्याला जवळ असलेल्या त्या करपटवाडीमध्ये बघ्यांची गर्दी ओसंडून वाहत असून आदिवासी कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्या करपटवाडीमधील कुटुंबाची साहस कथा अगदी त्यांच्याच भाषेत दैनिक रामप्रहरच्या वाचकांसाठी…

करपटवाडीतील भला या आदिवासी कुटुंबातील आजी व दोन नातू यांच्यावर दिनांक 14 जून 2019 वार शुक्रवार रोजी सकाळी जंगलालगत असलेल्या शेतात दोन्ही नातूंवर वाघाने हल्ला करून जखमी केले होते. त्या कुटुंबाला भेट देऊन सत्य परिस्थिती त्या दोन साहसी बालकांनी आपल्या तोंडून सांगितली.आमच्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात बहुसंख्येने आदिवासी समाज राहतो. बहुतांश आदिवासींचे जीवन जंगलातील रानमेवा गोळा करून आठवडी बाजारात विकून उदरनिर्वाह  चालतो. माळशेज घाटाच्या पायथ्यापासून काही अंतरावर जंगलात 65  झोपडीवजा घरे असलेली करपटवाडी वसलेली आहे. आदिवासी याच घनदाट जंगलालगत शेती करतात. शेतात भात, वरई, नागली, उडीद, खुरासनी, तीळ, हुरवळ, या बरोबर उन्हाळी हरभरा, मूग, तूर ही पिके घेतली जातात. शेतीचा हंगाम सुरू झाल्याने काळूराम रामू भला. हे सकाळी लवकरच शेतावर भाताची पेरणी करायला गेले होते. मुलगा शेतावर गेलाय म्हणून काळूराम यांची आई कान्हीबाई या नातू नरेश, हर्षद, नरेशची मोठी बहीण सोनू, मुलांची आत्या वैशाली असे पाच जण जेवनाची शिदोरी, पाणी, कोयता, विळा घेवून शेतावर पोहचले. इकडे वाट पाहून काळूराम नांगर घेऊन दुसर्‍या रस्त्याने घरी निघून गेले. शेतात आल्यावर आजी काम करू लागली. पोरांनी जांभळीवर जांभळे खायला जाण्यासाठी हट्ट धरला. नरेश अन् हर्षद धावत जांभळीच्या झाडाजवळ जाऊन जांभळीकडे वर पाहत उभे होते.

नरेश म्हणतो मां जांभळीकडे वर बघत व्हतू, तवढ्यात कुटून तरी तो वाघ आला. अंगावर उडीच घातली. माल तडपून रहला अन् बराचसा टाइम तसाच रहला. मां आयी आयी माल खाल्ला, आयी आबा, आयी आबा माल खाल्ला ,. माल सूडवा. लवकर सूडवा. मां पका आरडत हुतू. हर्षद, आयी दादाल खाला, आयी दादाल खाला. आये आये दादाल सोडयना… सोडयना आसं वरडत व्हता. आजीनं ऐकलं. आजी धाईनी येत हां… हां ….हां ….आसा वरडत व्हुती. पर तरीही तो पळत नुता. त्याल आजीनं नरेशच्या अंगावरनं हातानं बाजूला केला. तरी वाघ पळत नुता. आजीने नरेशला सोडयला अन् मंग मंज्यावर त्यांन उडी मारली हर्षद म्हणाला. नरेश म्हणत होता, मंग, हर्षदवर त्यानं पाठीमगून उडी मारून वाघानं एक पंजा डोक्याव ठिलेला अन् दुसरा पंजा पाठीव मारून नखानी ओरबारडला अन् त्याल उपडा पाडला. हर्षद म्हणतो, बाबो, मां बहू घाबरलो व्हुतू. नरेशने मागचा पुढचा विचार न करता, न घाबरता. दगडी उचलून मारली. परत दोन दगडी मारली. आजीने धाईन आली अन हर्षदवरनं वाघाला लोटून दिला. मंग तो तेठून थोडाक बाजूला झाला. आजीने कोयत्याने भ्या दाखवला.थोडा दुर जावून परत मंग्या फिरला.तवा आजी हां… हां… करत मांय नातवंडाले सोड… मालें खां, पण मायें नातवंडाले सोड… गावदेवी माझ्या नातवंडाले वाचेय व अशी आजी सारखी आनाभाका करत व्हती.

आजी मोठमोठ्यानं वरडत म्हणत व्हती, पोरी कोयता आना व. कोयता आना. माले याले कोयत्यानी हानू दे! तवा पोरीनी आजीकडं धारदार कोयता दुरून घालयला. मंग आजीनं कोयता पटकन उचलून वाघावर उगारला. तवा तो वाघ रानाच्या वाटेनं हळूहळू पळाला. वाघाच्या तावडीतून सुटल्यानंतर प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत त्यानं रानावाटे जाणार्‍या वाघाकडे पाहिले असता. हर्षदने प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या वाघाचे वर्णन आज तो माझ्याजवळ घाबर्‍या आवाजात असा करत होता. वाघ बहु मठा हुता. त्याची शेप लांब व्हती. तोंड मठा हुता. वाघाच्या अंगावर पिवळी, काळी, धवळी टिपकं हुतं. तो बहु भयानक दिसं… नरेश घाबर्‍या आवाजात म्हणाला, जीव वाचल्यानं बरा वाटत व्हुता, पण बहू भ्या वाटत व्हती. हातपाय लडपट करत व्हते. अन छातीत सारखा धडधड व्हय. रगात निघं वय. मंग आमी घरी आलो. नरेशच्या वडिलांना ही माहिती समजताच त्यांचे हातपाय लटपटायला लागले. तत्काळ त्यांनी ग्रामीण रूग्णालय टोकावडे येथे दोघा मुलांना दाखल करून डॉक्टरांनी उपचार सुरू केला, परंतु दाखल करून घेण्यापूर्वी डॉक्टरांनाही कदाचित वाटले असेल? त्यांना कुत्र्याने वगैरे चावले असेल? असा संशय येणेही साहजिक आहे, परंतु आजीने त्यांच्यासमोर सत्य परिस्थिती कथन केल्यावर सर्व आश्चर्य व्यक्त करत होते. मग काय सर्व स्तरातून कौतुक होवू लागले. त्यांनी वेळप्रसंगी दाखवलेल्या शौर्याची, धाडसाची बातमी वार्‍यासारखी पसरली तशी पंचक्रोशीतील अन् करपटवाडीतील आदिवासी समाजाबरोबर इतर समाजातील सर्व लहानमोठी माणसे मिळेल त्या वाहनांनी दवाखान्यात पोहचली कुटुंबाला धीर देत आधार देत होती.

 अशी ही करपटवाडीची बालकांची शौर्यकथा वाचणार्‍या प्रत्येकाला प्रेरित करते. आज नरेश काळूराम भला व हर्षद विठ्ठल भला यांची आडनावे भला बदलून वाघ ठेवावी की काय? असा प्रश्न मला पडतो. जंगलात हल्ला करणारा वाघ होता, पण दोन नातवांबरोबर कान्हूआजी ही वाघीण होती. म्हणूनच यांच्या शौर्याची कथा सदैव गुंजत राहील.

-संतोष पेरणे

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply