Breaking News

ट्रेकर्स आणि भाविक चढताहेत भीमाशंकरची वाट

कर्जत : बातमीदार

12 ज्योतिलिंगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे सोमवारपासून सुरू होणार्‍या श्रावण महिन्यात भीमाशंकर महाराज यांच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी असते. भीमाशंकरला जाण्यासाठी पायवाट कर्जत तालुक्यातून जाते. यामुळे हौशी ट्रेकर्स प्रचंड संख्यने दिवस रात्र भीमाशंकरची वाट तुडवीत असतात, पण सलग दुसर्‍या वर्षी कोरोनामुळे भीमाशंकरचे मंदिर बंद असल्याने भक्तांचा हिरमोड होत आहे, तरीदेखील ट्रेकिंगसाठी विकेंडला हजारो ट्रेकर्स भीमाशंकर अभयारण्यामधून जंगलाची वाट शोधत असतात. भीमाशंकरला खांडस मार्गे जाणार्‍या भाविकांची रीघ लागली आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे असून तेथे पुणे जिल्ह्यातून वाहन घेऊन पोहचता येते, तर भीमाशंकर या अभयारण्यातून निसर्गाचा आनंद घेत आणि औषधी वनस्पती यांचा अभ्यास करीत शेकडो ट्रेकर्स आणि पर्यटक कर्जत तालुक्यातील दोन पायवाटांनी भीमाशंकर येथे पोहचत असतात. भीमाशंकर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खांडस आणि काठेवाडी येथून दोन वाटा भीमाशंकर अभयारण्यात घेऊन जातात. खांडस गावी पोहचण्यासाठी कर्जत आणि नेरळ रेल्वे स्थानकातून प्रवासी वाहने आहेत. नेरळ स्टेशन आणि तेथून कशेळे येथे आल्यानंतर कशेळे येथून खांडसकडे जाणार्‍या मिनिडोअर उभ्या असतात. कशेळे ते खांडस हा 14 किमीचा हिरव्यागार झाडीतून जाणारा रस्ता घाट चढण्यासाठी नवी ऊर्जा देत असतो. थोडासा अवघड असणार्‍या शिडी घाटमार्गे पावणेदोन तासात भीमाशंकरला पोहचता येते. अनेक वर्षांपासून असलेली लाकडी शिडी बदलून त्या ठिकाणी लोखंडी शिडी लावल्याने धोकादायक मार्ग थोडा सोपा झाला आहे.दुसरा रास्ता कलावंतीच्या माळावरून गणपती घाटमार्गे, भीमाशंकर अभयारण्यातून जातो या मार्गाने अडीच तासात भीमाशंकरला पोहचता येते. पावसाळ्यात अत्यंत आनंददायी असा हा अनुभव सर्वांना घेता येतो. भाविक आणि ट्रेकर्स दरवर्षी न चुकता भीमाशंकरला येतात. कोरोनामुळे राज्यातील मंदिरे बंद आहेत आणि त्यामुळे भक्तांना भीमाशंकरच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेता येत नाही. गेल्या वर्षी भक्तांना बंद असलेले हे मंदिर या वर्षी देखील बंद आहे, मात्र भीमाशंकर अभयारण्यामधून केले जाणारे ट्रेकिंग अनुभवण्यासाठी पर्यटक आणि ट्रेकर्स भीमाशंकरची वाट चढत आहेत.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Leave a Reply