नाशिक : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने 288पैकी 50चा आकडा पार करून दाखवावा, असे आव्हान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना आमच्या शुभेच्छा, पण मुख्यमंत्री आघाडीचा होणे हा फार दूरचा विषय, असा टोला त्यांनी लगावला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात विरोधी पक्षनेत्यांपासून अनेक नेते भाजपमध्ये आले. आता तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पुढच्या बाकावरचे सोडल्यास त्यांच्या मागे राहायलाही कोणी तयार नाही. पहिल्या फळीतीलसुद्धा भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत, असा दावा ना. महाजन यांनी केला. आषाढी एकादशीला जसे वारकर्यांचे डोळे विठूरायाकडे लागतात, तसे आता सगळ्यांचे डोळे भाजपकडे लागले आहेत. कारण भाजपशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात 10 किंवा 13 ऑक्टोबरला राज्यात विधानसभा निवडणुका होतील, तसेच 10 किंवा 15 सप्टेंबरला आदर्श आचारसंहिता लागू शकते, असे भाकित ना. महाजन यांनी या वेळी वर्तविले.