Breaking News

न्यू ऑरेंज सिटी को-ऑप. सोसायटीतील गैरव्यवहारप्रकरणी तातडीने चौकशीचे आदेश

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपप्रश्नाला मंत्री डॉ. पंकज भोयर यांचे उत्तर

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त
न्यू ऑरेंज सिटी अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी मर्यादित संस्थेतील गैरव्यवहारासंदर्भात तातडीने सखोल चौकशी करण्यात येईल आणि एक ते दीड महिन्यात चौकशी अहवाल सादर करून पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सोमवारी (दि. 17) विधीमंडळाच्या अधिवेशनात दिली.
नागपूर जिल्ह्यातील न्यू ऑरेंज सिटी अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी मर्यादित संस्थेच्या अध्यक्षांनी ठेवीदारांच्या रकमेत केलेल्या गैरव्यवहाराचा मुद्दा सोमवारी विधानसभेत उपस्थित झाला. या संस्थेच्या अध्यक्षांनी ठेवीदारांच्या ठेवींच्या रकमेत गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडून देण्यात आलेल्या उत्तराच्या अनुषंगाने उपप्रश्न उपस्थित केला. कलम 88च्या अंतर्गत कारवाई सुरु असल्याचे उत्तर शासनाकडून देण्यात आले आहे. 21 एप्रिल 2023च्या आदेशान्वये 88ची चौकशी सुरू झालेली आहे. अशा पद्धतीचा ज्या वेळेला गैरव्यवहार होतो त्या वेळेला या संदर्भामध्ये लवकरात लवकर जबाबदारी निश्चित करणे आणि अशा प्रकरणातील वसुली करून ठेवीदाराला न्याय मिळवून देणे अपेक्षित असते. जर दीर्घकाळ चौकशी चालू राहिली तर ठेवीदारांना न्याय कसा मिळणार असा सवाल आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित करून किती कालावधीत चौकशी पूर्ण होईल आणि संबंधित ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही करण्याची मागणी सभागृहात केली.
या प्रश्नावर सभागृहात उत्तर देताना मंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले की, आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केलेला प्रश्न खरा आहे. न्यू ऑरेंज सिटी अर्बन क्रेडीट को-ऑप सोसायटी मर्यादित संस्थेमध्ये गैरव्यवहार झाल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आलेली आहे. या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी विशेष लेखापरीक्षक-2 यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निश्चितच चौकशीला उशीर झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून एक ते दीड महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर केला जाईल आणि त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्याचे त्यांनी सभागृहात आश्वासित केले.

Check Also

खारघरमध्ये आरोग्य तपासणी शिबिर

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थितीखारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त सेक्टर 20 मधील हावरे …

Leave a Reply