पनवेल : प्रतिनिधी
गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात गावदेवी पाडा स्वामी समर्थ मठ पनवेल येथे साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या दिवशी ग्रहणाचे वेध लागत असल्याने पहाटेपासून दुपारपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, दुसर्या दिवशी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन आगरी समाज हॉल येथे करण्यात आले आहे. जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मठाधिपती सुधाकर घरत यांनी केले आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्त श्रींची काकड आरती, नित्यनैमितिक पूजा प्रसाद, लघुरुद्र, श्री दत्तगायत्री, होमहवन, श्री स्वामी समर्थ महिला मंडळ यांची भजने असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ग्रहण असल्याने, तसेच वेध सुरू होत असल्याने स्वामी समर्थ मठात दुपारपर्यंत भक्तांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. दुसर्या दिवशी सद्गुरू नानामहाराज परांजपे यांच्या कृपाशीर्वादाने महात्मा ज्योतिबा फुले जनआधार योजनेंतर्गत श्री स्वामी समर्थ मठ गावदेवी पाडा पनवेल व तेरणा स्पेशालिस्ट हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेच्या दरम्यान मोफत आरोग्य शिबिरात रक्तदाब तपासणी, मधुमेह, ईसीजी, डोळे तपासणी, तसेच अल्पदरात चष्मेवाटप केले
जाणार आहेत. त्याचप्रमाणे हृदयाची अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, पेसमेकर, हृदयात असलेले छिद्र व त्याची शस्त्रक्रिया, कॅन्सर, मूतखडा, मूत्रमार्ग, मणक्याची शस्त्रक्रिया, तसेच अन्ननलिका, थायराईड, कॅन्सर, महिलांचे आजार आणि त्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येणार आहे. या सर्व आजारांवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याने सोबत येताना रुग्णाने ओरिजनल रेशनकार्ड, ओळखपत्र आणि जुने रिपोर्ट बरोबर घेऊन येण्याची सूचना श्री स्वामी समर्थ मठातर्फे स्वामीसेवकांनी केली आहे. त्याचप्रमाणे इतर धार्मिक कार्यक्रम आणि संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मठातर्फे सांगण्यात आले आहे.