Breaking News

परजिल्ह्यातील मजुरांच्या चेहर्‍यावर फुलले हास्य; पशुसंवर्धन विभागाचा मदतीचा हात

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणीवाडी व पाचाड येथे रायगड किल्ल्याच्या कामासाठी परजिल्ह्यातून आलेले कामगार अडकून पडले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे पशुधनही (90 गाढवे) अडकून पडले होते. पशुसंवर्धन विभागाने या मजुरांसाठी अन्नधान्य व त्यांच्या पशुधनासाठी चारा उपलब्ध करून दिला. त्यामुळे या चिंतेत असलेल्या मजुरांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले आहे.

 पाचाड येथे अडकलेल्या मजुरांना मदत करा, असे आदेश जिल्हाधिकारी  निधी चौधरी यांनी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुभाष म्हस्के यांना दिले होते. त्यानुसार पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुभाष म्हस्के व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अर्ले हे तत्काळ कामाला लागले. त्यांनी क्षेत्रीय पातळीवरील अधिकार्‍यांना प्रोत्साहित केले व स्थानिक स्तरावरून मदतीचे नियोजन करून या मजुरांसाठी अन्नधान्य व त्यांच्या पशुधनासाठी अवघ्या तीन तासांत चारा उपलब्ध करून दिला.

छत्री निजामपूर सरपंच प्रेरणा सावंत, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. दत्तात्रय सोनावळे,  ग्रामसेवक विजय जाधव, पशुधन पर्यवेक्षक मंजुषा गायकवाड, शिवराम दर्शने रयांनी प्रयत्न करून या मजुरांचा अन्नधान्याचा व त्यांच्या पशुधनाच्या चार्‍याचा प्रश्न सोडविला.

 पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांनी या मजुरांचा व त्यांच्या पशुधनाचा केवळ जेवणाचाच प्रश्न मिटविला असे नाही, तर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या मजुरांच्या भविष्याचा विचार करून त्यांना स्थानिक स्तरावर रस्ते बांधकामाची जी कामे चालू आहेत, त्या कामांवर मजुरीची कामेही  उपलब्ध करून दिली आहेत. अशाच प्रकारे अलिबाग समुद्रकिनारी घोडागाडी व्यवसाय करणार्‍या अन् सध्या लॉकडाऊनमुळे पर्यटन व्यवसाय बंद असल्याने उपासमार होणार्‍या अंदाजे 100 घोड्यांसाठी 300 किलो मका, भरडा प्रीमियम पोल्ट्री, अलिबाग यांच्या सहकार्याने जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अलिबाग येथे पुरविण्यात आला. यासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. मेघा खवस्कर, पशुधन पर्यवेक्षक डॉ. कैलास चौलकर, डॉ. सुहास जोशी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातील अधिकारी-कर्मचार्‍यांनी पुढाकार घेतला.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply