लाखो लिटर पाण्याची नासाडी, एमजेपीचे दुर्लक्ष
खारघर : प्रतिनिधी
पनवेल ते जेएनपीटीकडे जाणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी मोठ्या प्रमाणात फुटल्याने दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. अनेक वेळा दुरुस्त करून देखील जलवाहिनी वारंवार फुटत आहे. विशेष म्हणजे पनवेल महानगरपालिका व सिडको क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी संकट ओढवले असताना लाखो लिटर पाण्याची नासाडी दररोज होत आहे.
पनवेल शहरातून एमजेपीची जलवाहिनी जेएनपीटीकडे गेली आहे. पनवेल शहर कोळीवाडा परिसरातून कारंजाडे, पारगाव, दापोली, विठ्ठलवाडी, चिंचपाडा तलाव या सुमारे 6 ते 7 किमीच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात जलवाहिनी फुटली आहे. ही जलवाहिनी जीर्ण झाल्याने सहजरीत्या जलवाहनीला फोडून पाणी चोरीचा प्रकार या ठिकाणी केला जात आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे, तसेच झोपडपट्टी रहिवासी, टँकर माफिया या ठिकाणी रात्रीच्या वेळेला पाणीचोरी करीत आहेत.
हा सर्व प्रकार उघड्यावर सुरू असताना देखील या प्रकारावर आळा घालण्यात येत नाही. विशेष म्हणजे ही जलवाहिनी पनवेल शहरातून आलेली आहे. या पनवेल शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसातून एकवेळ देखील निश्चित पाणी मिळत नसल्याने पनवेलची तहान सध्याच्या घडीला टँकरवर भागवावी लागत असताना दिवसाला लाखो लिटर पाण्याची नासाडी सर्वांच्या डोळ्यादेखत होत असताना प्रशासन शांत का, असा प्रश्न विचारला जात आहे. सहा किलोमीटरच्या अंतरावर 20 पेक्षा जास्त ठिकाणी ही जलवाहिनी फुटली आहे. संबंधित जलवाहिनी अमृतयोजनेंंतर्गत नव्याने बांधली जाणार आहे. त्या योजनेला मंजुरी देखील मिळाली आहे, मात्र हे काम पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन वर्षाचा कालावधी जाणार आहे. तोपर्यंत अशाच प्रकारे पाण्याची नासाडी होणार आहे का, असा संपप्त सवाल येथील नागरिक उपस्थित करीत आहेत.