26 जुलै 2005 रोजी अतिवृष्टी होऊन माथेरानमध्ये निसर्गाचे व येथील लोकांचे खूप नुकसान झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती 14 वर्षांनंतर होते की काय अशी भीती येथील स्थानिक नागरिकांना वाटू लागली होती.14 वर्षांनंतर पुन्हा 2019च्या 26 जुलैला अतिवृष्टी सुरू झाली व नागरिक भीतीच्या सावटाखाली होते. जसजसा पाऊस वाढत होता तसतशा जुन्या आठवणी येऊन अंगावर काटा उभा राहत होता.
माथेरान हे उंच डोंगरावर असल्याने येथे जोरदार पाऊस पडतो हे सर्वत्र माहीत आहे, मात्र 14 वर्षांनंतर पुन्हा माथेरानमध्ये अतिवृष्टी झाली व माथेरानमधील नागरिक भीतीच्या सावटाखाली गेले. शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांचे व्यवहार सुरळीत सुरू होते. भरपावसात पर्यटकसुद्धा आनंद घेत होते, मात्र दुपारनंतर पावसाने रौद्र रूप धारण केले व मुसळधार पावसाचे अतिवृष्टीत रूपांतर झाले. 26 जुलैच्या दुपारी साडेबारानंतर पावसाने जोर धरला. तसा पर्यटकांसह नागरिकांचा ओघ माथेरान बाजारपेठेत कमी होऊ लागला. हळूहळू पावसाचा जोर वाढून अतिवृष्टी जोर धरू लागली व मेघगर्जनेसह पाऊस बरसू लागला. अतिवृष्टी सुरू झाल्यानंतर
माथेरानमध्ये दाखल झालेल्या पर्यटकांची फारच धांदल उडाली. मोठमोठे थेंब अंगावर झेलत त्यात थंडीचा कडाका यामुळे पर्यटक भिजलेल्या अवस्थेत कुडकुडत भेटेल त्या दुकानात आश्रय घेत होते. पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केल्यानंतर दुकानांमध्ये आश्रय घेणार्या स्थानिक नागरिकांत आपापसात 14 वर्षांपूर्वीच्या घडलेल्या आठवणी ताज्या होऊ लागल्या. 26 जुलै 2005 रोजी पडलेल्या पावसात माथेरानमध्ये नैसर्गिक आणि वित्तहानी फार मोठ्या प्रमाणात झाली होती. माथेरान प्रवेशद्वार दस्तुरी येथे भूस्खलन होऊन माथेरान घाट रस्ता बंद झाला होता. सखाराम तुकाराम पॉइंटचा भाग झाडांसह वाहून गेला होता. त्यामध्ये चार हजारांपेक्षा जास्त झाडे वाहून गेली होती, तसेच मिनीट्रेनच्या रेल्वे रुळाखालील जमीन वाहून जाऊन रेल्वे दरीमध्ये लटकत होती. त्या रात्री दोन स्थानिकांची घरे वाहून गेली होती, मात्र शेजार्यांच्या अतिदक्षतेमुळे घरातील सर्वांना सुरक्षितस्थळी हलविले होते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. वॉटर पाइप स्टेशन येथील डोंगर वाहून गेला होता. मायरा पॉइंट येथील जमीन वाहून गेल्यामुळे पॉइंटला जाणारा रस्ता बंद झाला. पॅनोरमा व गारबाट पॉइंटचीसुद्धा तीच परिस्थिती होती व आजही हे पॉइंट बंद अवस्थेत आहेत.
तीच परिस्थिती अनुभवण्यास मिळते की काय अशी भीती येथील स्थानिकांना वाटू लागली. त्यावेळेस एक हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला होता व ही अतिवृष्टी पाहून हा पाऊस सतत पडत राहिला तर अनर्थ घडू शकतो, या भीतीने स्थानिकांच्या भुवया उंचावल्या होत्या, पण 2005 साली ती काळरात्र होती व यावेळेस दुपारच्या सत्रात पाऊस पडत असल्यामुळे स्थानिकांना इतके टेन्शन नव्हते. 30 जुलै 2005 या तारखेला गटारी अमावस्या असल्यामुळे व आषाढ महिन्याचा शेवटचा शनिवार व रविवार असल्याने माथेरानमध्ये पर्यटकांनी शुक्रवारपासूनच येण्यास सुरुवात केली, पण येथील पावसाने रौद्र रूप धारण केल्यामुळे त्यांच्या आनंदावर पावसाचे विरजन पडले. जोरदार अतिवृष्टीमुळे बाजारपेठेतील गटारे तुंबली व पाणी रस्त्यावर येऊन वाहू लागले. त्यामुळे गटार आणि रस्ता एक झाले होते. दिवाडकर हॉटेलच्या समोरील भाग पाण्यात गेला होता. पर्यटक भीतीपोटी गोंधळून गेले होते. पाण्याचा प्रवाह वाढत होता म्हणून पर्यटक येथील जवळच्या दुकानांमध्ये आश्रय घेत होते, तर काही आपल्या इच्छितस्थळी जात होते, पण अतिवृष्टी होऊनही
माथेरानची अस्मिता असलेली मिनीट्रेन अखंडित सुरू होती, तर येथील तिन्ही शाळा अतिवृष्टीमुळे लवकर सोडण्यात आल्या. माथेरानमध्ये गेल्या दोन दिवसांत 200 मिलिमिटर पाऊस झाला होता, तर यावर्षी दोन महिन्यांतील सर्वात जास्त पाऊस पडणारा दिवस असणार आहे 27 जुलै 2019.
26 जुलै 2005च्या आठवणी ताज्या असतानाच 26 जुलै 2019मध्ये माथेरानमध्ये अतिवृष्टी सुरू झाली. गेल्या 24 तासांत झालेल्या अतिवृष्टीत 437 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 14 वर्षानंतर प्रथमच एका दिवसात इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या पावसात 2005ची पुनरावृत्ती झाल्याचा भास येथील नागरिकांना होत आहे. रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद माथेरान येथे झाली आहे.
शुक्रवार 26 जुलै 2019 रोजी सकाळपासून माथेरानमध्ये अतिवृष्टी होण्यास सुरुवात झाली. पावसाचा वाढणारा जोर अधिक असल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली.संपूर्ण जनजीवन ठप्प झाले. कोणीही घराबाहेर पडू शकले नाही. इंदिरा गांधी नगर परिसरात दीपक सुतार व पांडुरंग कदम यांच्या घरावर झाड पडले, तर बाजारपेठेत एका दुकानावर झाड पडले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच सखाराम तुकाराम पॉइंट येथे रेल्वे ट्रॅकमध्ये दरड कोसळल्याने मिनीट्रेन शटल सेवा बंद करण्यात आली. पावसाच्या वाढत्या प्रमाणाचा फटका कर्जत येथील उल्हास नदीला बसला आहे. माथेरानला उतार असल्याने पाण्याचा निचरा लवकर होऊन येथील पाणी उल्हास नदीमध्ये जाते. त्यामुळे नदीचे पात्र भरून पूरस्थिती होत आहे. आपत्ती व्यवस्थापन सक्रिय असल्याचे या वेळी दिसून आले. माथेरानमध्ये होत असलेल्या अतिवृष्टीत दीपक सुतार व पांडुरंग कदम यांच्या घरावर झाड कोसळले तसेच इंदिरा गांधी नगरच्या पुढे दरड कोसळली होती. याबाबत बांधकाम सभापती प्रसाद सावंत, पालिकेचे लिपिक रत्नदीप प्रधान, प्रवीण सुर्वे व विकास पार्टे यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचार्यांसह घटनास्थळी धाव घेतली व हे झाड तसेच दरड नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाने काढली.
माथेरानमधील सर्व जनतेने पर्यटकांबद्दल माणुसकी दाखविलेली दिसून आली. जे पर्यटक हॉटेलमधून निघणार होते, पण सर्वत्र बंद असल्यामुळे त्यांना काही हॉटेलवाल्यांनी व लॉजधारकांनी माणुसकी दाखवत त्यांना मोफत राहणे, खाण्या-पिण्याची व्यवस्था केली. वन व्यवस्थापनाने मदतीचा हात देत शहराला सावरण्याचा प्रयत्न केला. त्यात माथेरानमध्ये फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. या पार्श्वभूमीवर कोणाच्या घरावर झाड कोसळले किंवा घराचे काही नुकसान झाल्यास वन व्यवस्थापन समितीकडून आर्थिक मदत मिळेल, असे अध्यक्ष योगेश जाधव यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे पर्यटनावर परिणाम झालेला दिसून आला.
आषाढ महिन्याचा शेवटचा शनिवार-रविवार असल्याने माथेरान फुल्ल होणार. त्यामुळे पर्यटकांनी येथील हॉटेल आणि लॉजिंगची ऑनलाइन बुकिंग करून ठेवली होती, मात्र सर्वत्र होत असलेल्या पावसामुळे ही बुकिंग रद्द झाल्याने येथील पर्यटनावर पाणीपडले आहे. टॅक्सी आणि रेल्वेने दाखवली तत्परता तसेच गेली दोन दिवस माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकांना जाण्यासाठी रेल्वेच्या शटल सेवा सुरू ठेवल्या होत्या.
अतिवृष्टीतसुद्धा मिनीट्रेन धावत होती, मात्र सखाराम तुकाराम पॉइंट येथे रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याने मिनीट्रेन वाहतूक बंद करण्यात आली, पण पर्यटकांच्या सेवेसाठी टॅक्सी सर्व्हिस अखंडित सुरू होती. पुढील दिवसांत ही अतिवृष्टी सुरू राहणार असल्याने येथील पोलीस, महसूल, नगरपालिका व वन व्यवस्थापन समिती सतर्क असून ते संपूर्ण माथेरानवर लक्ष ठेवून आहेत. काही अघटित घडल्यास सोशल मीडियाचा वापर करून कळविण्याचीही व्यवस्था केली आहे.
–संतोष पेरणे