पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका हद्दीत जीवनावश्यकखेरीज इतर दुकानेही सुरू करावीत, अशी सूचना महापालिकेतील सत्ताधारी भाजपने आयुक्तांकडे केली होती. त्याला प्रतिसाद देत महापालिकेने ठरवून दिलेल्या वारानुसार सकाळी 7 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान ही दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली असून, या वेळी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.
कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने पनवेल महापालिकेचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे, मात्र पनवेलमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता विविध आस्थापने, दुकाने बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे पनवेल महापालिका हद्दीतील व्यापारी दुकाने सुरू करण्यासोबतच अन्य विविध प्रश्नांसंदर्भात महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, भाजप पनवेल शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, ज्येष्ठ नगरसेवक अनिल भगत यांनी 8 मे रोजी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानुसार दैनंदिन जीवनाशी निगडित असलेली विविध आस्थापने, दुकाने विविध अटी व शर्थींच्या आधारे सुरू करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्याची रविवार (दि. 10)पासून अंमलबजावणीही झाली.
महापालिकेकडून यापूर्वी घोषित केलेले कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी विविध व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखण्याची जबाबदारी प्रत्येक दुकानदाराची आहे. याशिवाय दुकानदारांना मास्क, सॅनिटायझर, ग्लोज तसेच ओळखपत्र अनिवार्य आहे. विशेष म्हणजे दुकानदारांनी ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धतीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. व्यापारी संकुले तसेच मॉल्सवरील निर्बंध मात्र कायम आहेत. त्याचप्रमाणे जिम, स्विमिंग पूल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोविडचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने या आस्थापनांना निर्णयामध्ये कोणत्याही प्रकारची सूट नसणार आहे.
पनवेलमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. त्याचबरोबर मान्सूनपूर्व अनेक कामे लॉकडाऊनमुळे रखडल्याने नागरिकांना ही कामे पूर्ण करून घेण्यासाठी दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग तसेच महापालिकेने दिलेल्या अन्य निर्देशांचे पालन करून घराबाहेर पडावे. दुकानांसमोर गर्दी वा अन्य नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. तसे झाल्याचे आढळून आल्यास त्याचा आढावा घेऊन दोनच दिवसांत निर्णय मागे घेतला जाईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
वारनिहाय सुरू राहणार दुकानेसोमवार व शुक्रवार : स्टेशनरी, जनरल स्टोअर्स, हार्डवेअर, बांधकाम साहित्य, स्टील, सिमेंट ट्रेडर्स, पावसाळी प्रावरणे (उदा. ताडपत्री, प्लास्टिक बंदी नसलेली प्रावरणे); मंगळवार व शनिवार : ऑटोमोबाइल दुकाने, वर्कशॉप, गॅरेज, सर्व्हिसिंग; बुधवार व रविवार : इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्री व दुरुस्ती दुकाने, कॉम्प्युटर, मोबाइल विक्री व दुरुस्ती, गॅस, कुकर, मिक्सर, एसी दुरुस्ती, भांड्यांची दुकाने; गुरुवार : होजिअरी, रेडिमेड, गारमेंट दुकाने, कपड्यांची दुकाने (शोरूम वगळून एकल दुकाने)
RamPrahar – The Panvel Daily Paper