गेल्या वर्षी नीती आयोगाच्या अहवालानुसार 600 दशलक्षपेक्षा जादा लोक उच्च टोकाच्या पाण्याच्या दुर्भिक्षाला सामोरे गेले असून दिल्ली, हैदराबाद, मंगळूर आणि चेन्नईसारख्या महानगरात आणखी एका वर्षात भूजल गायब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकणात मुसळधार पाऊस कोसळतो पण हे पाणी समुद्राला जाऊन मिळते. वाहून जाणार्या या पाण्याकडे कुणीही गांभीर्याने पाहत नाही. कोयनेचे लाखो लिटर पाणी असे वाशिष्ठीतून वाहून जात आहे. पाण्याचे नियोजन हवे, त्यासाठी जलसाक्षरता व्हायला हवी.
कोकणात मोसमी पाऊस दरवर्षी प्रचंड वृष्टी करीत असतो. पूर्वी विहिरी, तलाव, तळ्यांमध्ये हे पाणी साठवून त्याचा हिवाळ्यात आणि उन्हाळयात पिण्यास आणि सिंचनासाठी नियोजनबद्ध वापर केला जायचा. आज गावोगावी सांभाळून ठेवलेल्या पर्जन्य जलसंवर्धन संरचना आम्ही दुर्लक्षित केलेल्या आहेत. काही ठिकाणी तलावांच्या नैसर्गिक स्वरुपाला सुरुंग लावून सौंदर्यीकरणाच्या गोंडस नावाखाली त्यांना सिमेंट-काँक्रिटने नष्ट करण्याचे उद्योग चालू आहेत तर काही ठिकाणी अशा जलाशयांना बुजवून त्याच्यावरती नवीन इमारती, आस्थापनांचे बांधकाम केलेले आहे. आज आपल्या समाजात जलसाक्षरतेची अभिवृद्धी करण्यासाठी शैक्षणिक आणि सामाजिक स्तरावरती जागृतीसाठी उपक्रमांची गरज आहे. वर्षा जलसंधारणाची कामे माथा ते पायथा अशा पद्धतीने करणे गरजेचे आहे. नदीनाल्यांवरती नियोजनबद्ध वसंत बंधार्यांंची साखळी निर्माण करून उपलब्ध पाणी आणि त्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग कसा होईल, हे पाहणे महत्त्वाचे आहे. विहिरी, तलाव, नदी नाले, झ़र्यांंसारख्या जलस्रोतांच्या नैसर्गिक स्वरुपाचे जतन करून त्यात पाण्याच्या पैदाशीवरती भर देऊन देशातली जलसमृद्धी जपणे महत्त्वाचे आहे. आज गावाकडून शहराकडे स्थलांतर करणार्या लोकांची आकडेवारी वाढत असून गावात जल व्यवस्थापनाअभावी भूजल उद्ध्वस्त झाल्याने विहिरी, तलावातील पाणी गायब झालेले आहे. त्यामुळे पाण्याअभावी शेती, बागायतीबरोबर पारंपरिक उद्योगधंदे ओस पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी आणि उदरनिर्वाहाच्या साधनांच्या शोधार्थ माणसांचे तांडे गावांचा त्याग करीत असलेले दृष्टीस पडत आहेत. त्यामुळेच शहरांचा आज चेहरामोहरा बदलत असून स्थलांतरीत लोकांमुळे तेथे झोपडपट्टीची संख्या लक्षणीय होत चालली आहे. एका बाजूला देशात पिण्यायोग्य पाणी उसाच्या सिंचनासाठी वापरले जात आहे तर दुसर्या बाजूला प्रदूषणकारी घटकांनी युक्त पाण्याचे प्राशन करण्याशिवाय लोकांना अन्य पर्याय शिल्लक राहिलेला नाही आणि त्यामुळे पाण्यातून प्रसारित होणा़र्या विविध रोगांच्या साथींचे बळी वाढत चालले आहेत. हजारो लीटर सांडपाणी नदीनाले, सागरात सोडण्याऐवजी त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी सिंचनासाठी वापरात आणणे शक्य आहे, परंतु असे करण्याऐवजी पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पातून मिळणारे पाणी शेती-बागायतींना वापरून त्याची नासाडी केली जात आहे, ही चिंतेची बाब आहे. कोकणात धो-धो पाऊस पडतो, पण त्याची किमत कुणाला नाही, हे पाणी थेट समुद्रात जाते. वीजनिर्मितीतून कोयनेचे सोडले जाणारे अवजल असे वाशिष्ठीतून वाहून जात आहे, त्याचा साठा नाही आणि वापरही नाही. कोकणवासीयांनी याचा गांभीर्याने विचार करायला हवा, त्यासाठी जलसाक्षरता व्हायला हवी.