प्रयागराज ः वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी प्रयागराज येथे त्रिवेणी संगमात स्नान केलं. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर कुंभमेळ्यात स्नान करणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान ठरले. यावेळी मोदींनी सफाई कर्मचार्यांचे पाय धुवून त्यांचा सत्कारही केला. कुंभमेळ्यासाठी दरदिवशी लाखो भाविक येतात. असं असतानाही येथे स्वच्छतेची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या व्यवस्थेचं मोदींनी कौतुक केलं. कुंभमेळ्यात स्वच्छतेचं काम करुन या कर्मचार्यांनी स्वच्छतेचा मूलमंत्र जपला आहे. तसेच देशातील नागरिकांसमोर स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांची सेवा करणे, हे मी भाग्य समजतो, असं मोदींनी म्हटलं. कुंभमेळा परिसरातील स्वच्छता राखणार्या या सफाई कर्मचार्यांचा मोदींनी आगळ्यावेगळ्या पद्धतीनं सत्कार केला. त्यांनी सफाई कर्मचार्यांचे पाय धुतले व त्यांचे चरणस्पर्श करत आभारही मानले. मोदींच्या या कृत्याने सफाई कर्मचारीही अक्षरशः भारावून गेले आहेत. दरम्यान, मोदींनी ज्या सफाई कर्मचार्यांचे पाय धुतले त्यांचीही प्रतिक्रिया आली आहे. यामधील एक असणार्या नरेश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली की, पंतप्रधान आपले पाय धुतील असा विचारही कधी केला नव्हता, तर ज्योती यांचं म्हणणं आहे की, असा मान सन्मान आजपर्यंत आपल्याला कधीच मिळाला नव्हता. अन्य एकाने आपण जणू काही स्वप्नच पाहत आहोत असा भास होत होता असं म्हटलं आहे. भविष्यात आपण नरेंद्र मोदींनाच मतदान करणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. अन्य एका सफाई कर्मचार्यानेही मोदींना मतदान करणार असल्याचं सांगितलं आहे. मोदींनी फक्त आपले पाय धुतले नाहीत तर विचारपूसही केली असल्याचं त्याने सांगितलं. मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, असा निर्धार या कर्मचार्यांनी व्यक्त केला.