Breaking News

इको सेन्सेटिव्ह झोनच्या कायद्यात बदल करणार

पर्यावरणमंत्र्यांचे आश्वासन; साहसी खेळांनाही देणार प्रोत्साहन

कर्जत ः बातमीदार

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने 2003मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने माथेरान परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर केला. त्यामुळे माथेरानवर आलेले निर्बंध दूर करण्यासाठी माथेरान नगरपालिका प्रयत्न करीत होती. त्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी या प्रश्नावर गेली तीन वर्षे सातत्याने आवाज उठविला. गुरुवारी (दि. 1) नवी दिल्लीत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्या जटील अटी दूर करण्यासाठी इको सेन्सेटिव्ह झोनच्या कायद्यात बदल केले जातील, असे आश्वासन खासदार बारणे यांना दिले.

माथेरानमध्ये लावण्यात आलेल्या इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये अनेक निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे माथेरानमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्या अटी शिथिल करण्यात याव्यात यासाठी माथेरान नगरपालिका पाठपुरावा करीत होती, मात्र अडीच वर्षांपूर्वी थेट नगराध्यक्ष झालेल्या प्रेरणा प्रसाद सावंत यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन देऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. खासदार बारणे यांनी गेली दोन वर्षे केंद्रीय पर्यावरणमंत्री यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर विद्यमान केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना माथेरानमधील प्रश्नांची जाण असल्याने त्यांनी इको सेन्सेटिव्ह झोनमधील अटीमुळे कायद्यात बदल करण्याची होत असलेली मागणी लक्षात घेऊन माथेरानप्रश्नी नवी दिल्ली येथील संसद भवनातील कार्यालयात बैठक बोलावली होती. माथेरान गिरिस्थान परिषदेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी तसेच माथेरान गिरिस्थान नगरपरिषदचे गटनेते प्रसाद सावंत यांच्यासह खासदार बारणे यांनी पर्यावरणमंत्री जावडेकर यांची भेट घेतली.

प्रसाद सावंत व आकाश चौधरी यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना इको सेन्सेटिव्ह झोनच्या निर्बंधांमुळे येणार्‍या अडचणींची माहिती दिली. त्यावेळी तत्काळ निवेदनावर शेरा मारून माथेरानचे प्रश्न तत्काळ सोडविले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यात माथेरानकरांना प्रतीक्षा असलेली ई-रिक्षा सुरू करण्यात असलेल्या पर्यावरण विभागाच्या अडचणी दूर करणार आहेत. मातीची धूप रोखण्यासाठी पर्यावरण विभाग माथेरानमध्ये तज्ञांचे पथक नेऊन पाहणी करून त्याचा अहवाल मंत्रालयाकडे मागवून घेणार आणि त्यावर केंद्र सरकार मातीची धूप रोखण्यासाठी निधीची तरतूद करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. माथेरानमध्ये वन विभाग साहसी खेळांना मान्यता देत नाही, परंतु साहसी खेळांना प्रोत्साहन देतानाच रोजगार निर्मितीला चालना देण्याचा सरकारचा विचार आहे, तर माथेरानमध्ये कचरा उचलण्यासाठी मानवी हात वापरले जात असून त्या ठिकाणी माथेरान पालिकेने ट्रॅक्टरची मागणी केली आहे. ती मागणीही आपण तत्काळ मंजूर करीत असून माथेरानमधील कचरा मानवी हाताने उचलला जाणार नाही, असे पर्यावरणमंत्री जावडेकर यांनी स्पष्ट केले.

आपण यापूर्वी माथेरानमध्ये आलो असून तेथील परिस्थिती आपल्यावर माहीत आहे. त्यामुळे खासदार बारणे यांनी आपल्याला त्याबाबत बैठक लावण्याची मागणी केली होती. त्यामुळे तत्काळ वेळ देऊन पर्यावरण मंत्रालयाने यापूर्वी लावलेले निर्बंध दूर करण्यासाठी प्रसंगी कायद्यात बदल केला जाईल. माथेरानमध्ये आपल्याला पुन्हा एकदा जायला आवडेल. पूर्वी कुमार चौधरी हे आपले मित्र होते आणि त्यांच्या आग्रहास्तव आपण माथेरानला गेलो होतो.

-प्रकाश जावडेकर, केंद्रीय पर्यावरणमंत्री

माथेरान हे मुंबईच्या जवळचे पर्यटनस्थळ असून त्या ठिकाणी पर्यटनवाढीसाठी इको सेन्सेटिव्हचे निर्बंध कमी केले पाहिजेत या मताचा मी असून त्यासाठी आपण अनेक वर्षे माथेरानचा प्रश्न घेऊन प्रयत्न करीत होतो. पर्यावरणमंत्री जावडेकर यांच्या तत्काळ कार्यवाही करण्याच्या आश्वासनामुळे प्रश्न मार्गी लागेल.

-श्रीरंग बारणे, खासदार

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply