Breaking News

कुलभूषण प्रकरणाची पुनरावृत्ती?

नवी दिल्ली ः कुलभूषण जाधव प्रकरणानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर खोटा आरोप करीत एका कथित भारतीय गुप्तहेराला ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. पाकच्या एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार या गुप्तहेराला पाकच्या पंजाब प्रांतातील डेरा गाजी खान जिल्ह्यातून पकडण्यात आले. लाहोरपासून 400 किमी अंतरावरील हे ठिकाण आहे. राजू लक्ष्मण असे या कथित हेराचे नाव आहे. पाक पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्याने आपण भारतीय नागरिक असून पाकच्या पंजाब प्रांतात हेरगिरी करीत होतो, अशी कबुली दिल्याचे सांगण्यात आले. पाक पोलिसांच्या मते राजूला ताब्यात घेण्यात आले तेव्हा तो बलुचिस्तानमार्गे डेरा गाजी खान जिल्ह्यात प्रवेश करीत होता. त्याला अज्ञातस्थळी नेण्यात आले असून पाकचे अधिकारी त्याची चौकशी करीत आहेत. पाकने यापूर्वी कुलभूषण जाधव यांनाही कथित हेर असल्याचा दावा करीत तुरुंगात डांबले आहे. या आरोपाखाली त्यांना फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली होती, मात्र या प्रकरणात भारताने हस्तक्षेप करून आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतल्याने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती मिळाली आहे.

तरुणीवर सामूहिक अत्याचार

औरंगाबाद : घनसावंगी तालुक्यातील 19 वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना नुकतीच समोर आली. 7 जुलैला मुंबईतील चेंबूर येथे झालेल्या अत्याचारामुळे घाबरलेल्या पीडितेने घटनेची वाच्यता केली नव्हती. आजारी पडल्याने तिला नातेवाइकांनी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल केले, तेव्हा डॉक्टरांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून तिच्या वडिलांनी याविषयी बेगमपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. घनसावंगी तालुक्यातील 19 वर्षीय तरुणीचे भाऊ, भावजय मुंबईतील चेंबूर परिसरात राहतात. दोन महिन्यांपूर्वी पीडिता भावाच्या घरी गेली होती. 7 जुलैला मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते, असे सांगून बाहेर पडली. नंतर तिच्यावर चार जणांनी सामूहिक अत्याचार केला. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ती घरी परतली. तेव्हापासून ती आजारी पडली. भावाने गावाकडील वडिलांना फोन करून बोलावून घेतले. गावी प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी तिची तपासणी केली तेव्हा तिच्यासोबत काहीतरी गंभीर घडल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी तिच्या आई-बाबांना सांगितले. तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने तिच्यावर चार जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. याविषयी पीडितेच्या वडिलांनी बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

नवरदेवाचे विवाह मंडपातून अपहरण

नवी दिल्ली ः एक्स गर्लफ्रेंडचे दुसर्‍याबरोबर लग्न होणार होते. विवाह मंडपात लग्नाचे विधी सुरू होते. तितक्यात एक्स बॉयफ्रेंड तिथे पोहोचला व त्याने थेट नवरदेवाचे व त्याच्या भावाचे अपहरण केले. राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातील भाटा गावात मंगळवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. एखाद्या बॉलीवूड सिनेमाला शोभावा असा हा प्रसंग होता. जालम सिंह असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याने साथीदारांच्या मदतीने मिळून हे कृत्य केले. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केल्यानंतर त्यांनी बुधवारी नवरदेवाला व त्याच्या भावाला जासोल भागात सोडले. नगर गावात राहणारा नरपत सिंह वरात घेऊन वधूच्या भाटा गावात पोहोचला. त्याचवेळी जालन सिंह आपल्या साथीदारांसह तिथे दाखल झाला. त्याने नरपत सिंह आणि त्याचा भाऊ गणपत सिंह यांचे अपहरण करण्याआधी वरातीमधील वर्‍हाडी मंडळींना मारहाण केली. काही पाहुणेमंडळी या मारहाणीत जखमी झाली असून, त्यांच्यावर सिंधारी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply