ठाणे ः प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचे कार्य समाजासाठी मार्गदर्शक आहे. दिलेले काम कुठल्याही परिस्थितीत करायचे हे त्यांचे तत्त्व आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 1) डोंबिवली येथे जगन्नाथ पाटील यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभीप्रसंगी बोलताना केले.
या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाममंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खा. कपिल पाटील, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार सर्वश्री संजय केळकर, किसन कथोरे, नरेंद्र पवार, गणपत गायकवाड, सुभाष भोईर, निरंजन डावखरे, बालाजी किणीकर, जगन्नाथ पाटील यांच्या पत्नी पुष्पा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, पाटील यांनी आपली प्रत्येक जबाबदारी निष्ठेने पार पाडली आहे. नगरसेवक ते मंत्री असा त्यांचा प्रवास आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. त्यांच्या मुलीने लिहिलेले ‘कळसाचा पाया’ हे पुस्तक म्हणजे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी संपूर्ण कारकिर्दीत पारदर्शी काम केले. उत्पादन शुल्क मंत्री असताना त्यांनी एमआरपी प्रणाली आणली. चांगले वक्तृत्व असल्यामुळे ते सभागृहात प्रत्येक विषयावर बोलायचे. त्यातून आम्हालाही शिकायला मिळाले. त्यांच्या कुटुंबाने त्यांना साथ दिल्यामुळे ते आजपर्यंतचा हा प्रवास करू शकले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या.
एकनाथ शिंदे म्हणाले की, पाटील यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत एक विचारधारा घेऊन काम केले. त्यांच्या कार्याचा अनुभव आम्हाला नेहमीच कामात उपयोगी पडतो. अविरतपणे त्यांनी ठाणे जिल्ह्यात काम केले आहे. रवींद्र चव्हाण म्हणाले की, जगन्नाथ पाटील हा विचार महाराष्ट्राने पाहिला आहे. कुठलाही कार्यक्रम यशस्वी कसा करावा हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो आहोत. ठाणे जिल्ह्याच्या प्रगतीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. जगन्नाथ पाटील म्हणाले की, हा सत्कार माझा एकट्याचा नसून माझ्यासोबत काम करणार्या प्रत्येकाचा आहे. आयुष्यात मी अनेक चढउतार पाहिले. मी 1961 साली माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हा मी जसा होतो तसा आजही आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी जगन्नाथ पाटील यांची कन्या डॉ. जया पाटील यांनी लिहिलेले ‘कळसाचा पाया’ हे पुस्तक व ‘आगरी दर्पण’ या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. जगन्नाथ पाटील यांच्या वतीने समर्थ भारत व्यासपीठ, परिवर्तन महिला संस्था आणि हिंदू सेवा संघ या संस्थांना मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्माकर कुलकर्णी यांनी केले.