पनवेल ः वार्ताहर
तालुक्यातील ओवळे ग्रामस्थ मंडळातर्फे गावदेवी ओवाळू माता यात्रेनिमित्त छकड्यांच्या जंगी शर्यतीचे आयोजन नंदराज मुंगाजी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
या शर्यतींना महाराष्ट्र बैलगाडा संघटना अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बैलगाडा शर्यत हा केवळ मनोरंजनाचा विषय राहिलेला नाही तर राज्याची परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावातील यात्रा, विविध सणानिमित्त बैलगाडा शर्यती भरविण्याची परंपरा आजही जपली जाते. या शर्यतीबद्दल सर्वसामान्यांना किती प्रेम आहे याचे दर्शन रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील ओवळे येथील बैलगाडा शर्यतीदरम्यान दिसून आले आहे.
ओवळे येथे ओवाळू माता यात्रेनिमित्त विनाकाठी लाठी भव्य बैलगाडा शर्यती पार पडल्या. गेल्या अनेक महिन्यांपासून बैलगाड्या शर्यती पार पडलेल्या नसल्याने यंदाच्या बैलगाडी शर्यतीचे आकर्षण होते.
शासकीय नियमांचे पालन करून बैलगाडा शर्यत सुरू करण्यात आल्या. या वेळी अनेकांनी या शर्यती पाहण्यासाठी गर्दी केली होती. या वेळी शर्यती पाहण्यासाठी आलेल्या शर्यतप्रेमींना पंढरीशेठ फडके व नंदराज मुंगाजी यांनी मार्गदर्शन केले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.