Breaking News

मुंबईचा गुजरातला धक्का

प्रो-कबड्डीत अव्वल स्थानी विराजमान

मुंबई : प्रतिनिधी

प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात यू मुम्बाने घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळत असताना बलाढ्य गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाला पराभवाचा धक्का दिला आहे. चढाईपटू आणि बचाव फळीतल्या खेळाडूंनी केलेल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबईने या सामन्यात 32-20च्या फरकाने बाजी मारली. गुजरातचा या हंगामातला हा पहिला पराभव ठरला, तर मुंबईने या विजयासह 17 गुणांनिशी गुणतालिकेत पहिले स्थान मिळविले आहे.

आपल्या घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळणार्‍या यू मुम्बाने पहिल्या सत्रात आक्रमक सुरुवात केली. अभिषेक सिंह आणि रोहित बलियान या खेळाडूंनी मुंबईला चढाईमध्ये गुण मिळवून देत आघाडी मिळवून दिली. यानंतर संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांच्या बचावपटूंनी आपले वर्चस्व राखले. मुंबईकडून फजल अत्राचली, सुरिंदर सिंह यांनी गुजरातच्या चढाईपटूंना आपल्या जाळ्यात अडकवत मुंबईचे पारडे वर ठेवले. गुजरातकडून गुरुनाथ मोरे व अन्य खेळाडूंनी गुण मिळवण्याचे प्रयत्न केले, मात्र यामध्ये त्यांना यश लाभले नाही. गुजरातचा महत्त्वाचा खेळाडू सचिनला मुंबईच्या बचावपटूंनी एकही गुण कमावू दिला नाही. बचावपटूंनी केलेल्या आक्रमक खेळाच्या जोरावर मुंबईने मध्यांतराला 9-7 अशी आघाडी घेतली.

दुसर्‍या सत्रात मुंबईच्या खेळाडूंनी आपला खेळ अधिक आक्रमक केला. चढाई आणि बचावफळीत अष्टपैलू खेळ करीत गुजरातला सर्वबाद करीत मोठी आघाडी घेतली. मुंबईच्या या झंझावातापुढे गुजरातचा संघ पुनरागमन करूच शकला नाही. त्यातच मुंबईचा बचावपटू सुरिंदर सिंहने केलेल्या चढाईत गुजरातच्या चार बचावपटूंनी आपली विकेट बहाल केली. यामुळे गुजरात सामन्यात दुसर्‍यांदा सर्वबाद झाला. दुसर्‍या सत्रात मुंबईकडून कोरियन खेळाडू यूंग चँग को यानेही काही महत्त्वाचे गुण मिळवले. अखेरीस आपल्याजवळची मोठी आघाडी कायम राखत मुंबईने 32-20च्या फरकाने सामन्यात बाजी मारली.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply