पोलादपूर : प्रतिनिधी
संततधार पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता पूर आणि अतिवृष्टीने हानी झालेल्या सार्वजनिक तसेच खाजगी मालमत्तांची माहिती प्रशासनाकडे येत आहे. तालुक्यातील मोरसडे कामथी नदीवरील पायवाट पूल वाहून गेल्याने पादचार्यांना यापुढे मोठा वळसा घालून यावे लागणार आहे.
अतिवृष्टीमध्ये तालुक्यातील मोरसडे येथील कामथी नदीवर असलेला जुना पायवाट पूल पुरामध्ये वाहून गेला. या पायवाट पुलावरून आडाचाकोंड, बालमाची, भगतपेढा, सडे, सडेकोंड, दिवाळवाडी, गवळ्याचा कोंड, भोसाडी, नावाळे, शेंदवाडी येथील ग्रामस्थांची ये-जा होत असे. मोरसडे, सडे आणि वडघर येथील स्मशानभूमी, तसेच मोरसडे गवळ्याचा कोंड, आणि कामथे फौजदारवाडी येथील विहिरी, वडघर येथील विहीर व बंधारा आदी अतिवृष्टीत वाहून गेल्याचे पाहण्यास मिळत आहे. कामथे फौजदारवाडी व माडाचीवाडी येथील साकवदेखील कामथी नदीच्या जोरदार प्रवाहाने वाहून गेला. माटवण ते कणगुले-सवाद दरम्यानच्या मोरीवरून सतत चार दिवस पुराचे पाणी वाहात असल्याने सात गावांचा संपर्क तुटला होता. सोमवारीही पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील सावंतकोंड-पार्टेकोंड रस्त्यावर दरड कोसळून काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.
पोलादपूर तालुक्यातील 56 घरे, 11 गोठे आणि 4 सार्वजनिक मालमत्तांची अतिवृष्टीने हानी झाली असून, यापैकी 8 घरे आणि 1 गोठा मालकांना 42 हजार 120 रुपयांची सानुग्रह मदत देण्यात आहे. याखेरीज एका पूरबळीच्या नातेवाईकांना 4 लाखांचा धनादेश देण्यात आला आहे.
-समीर देसाई, नायब तहसीलदार, पोलादपूर