नागोठणे : प्रतिनिधी
या महिन्यात बकरी ईद, नारळी पौर्णिमा, गोकुळअष्टमी आदी सण, तसेच स्वातंत्र्य दिन सोहळा होत आहे. नागोठणे शांतताप्रिय गाव असून सर्वधर्मीय नागरिक येथे एकोप्याने राहत असून हे सर्व कार्यक्रम शांततेत साजरे करावेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी केले.
आगामी सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 9)सकाळी नागोठणे पोलीस ठाण्यात शांतता समितीची सभा घेण्यात आली. या सभेत घुटुकडे मार्गदर्शन करीत होते. हेवेदावे वाढतील असे वादग्रस्त किंवा राजकीय मेसेज व्हॉटसअॅप टाकू नयेत, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीत पोलीस, ग्रामपंचायत, वीजपुरवठा आदी विषयांसंदर्भातही चर्चा करण्यात आली. शहरात विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, रस्त्यावर अनधिकृतपणे उभ्या राहणार्या गाड्यांवर कारवाई करावी, ग्रामपंचायतीने परप्रांतीय भाडेकरूंकडून पुराव्याची कागदपत्रे घेणे बंधनकारक करावे, शहरातून वेगाने जाणार्या एसटी बसेसबाबत पोलिसांनी एसटीच्या वरिष्ठ अधिकार्यांचे लक्ष वेधावे, मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा अशा सूचना नागरिकांकडून करण्यात आल्या.
वीजवितरण कंपनीच्या येथील कार्यालयाकडे फक्त सहाच कर्मचारी असून मनुष्यबळ अपुरे आहे. या महापुरात अनेक ठिकाणचे पोल पाण्यात असल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. पूर ओसरल्यावर वीजकर्मचार्यांनी वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरील दिवे बदलण्याची कामगिरीसुद्धा आमच्या कर्मचार्यांनाच बजावावी लागत असल्याने नागोठणे ग्रामपंचायतीने आठवड्यातील एक दिवस निश्चित केला, तर आमचे दोन कर्मचारी दिवसभर या कामासाठी दिले जातील, अशी सूचना महावितरणचे कनिष्ठ अभियंता वैभव गायकवाड यांनी या वेळी केली. नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, रोहे पं. स. सदस्य बिलाल कुरेशी, भाजपचे तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर, शहर अध्यक्ष सचिन मोदी, संजय महाडिक, बापूमहाराज रावकर, धनाजी दपके, नाना वर्तक, इम्रान मुल्ला, हुसेन पठाण, भरत भोय, रवी शिर्के, आनंद लाड, आरपीआय नेते व्ही. के. जाधव, हेड कॉन्स्टेबल नीलेश महाडिक, शंकर भालेकर, अशफाक पानसरे आदी या सभेला उपस्थित होते.