मोटर स्पोर्ट्समध्ये विजेतेपद पटकाविणारी पहिलीच भारतीय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताच्या ऐश्वर्या पिस्सायने मंगळवारी (दि. 13) ऐतिहासिक कामगिरी केली. एफआयएम वर्ल्ड कपच्या महिला विभागात अजिंक्यपद पटकाविणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे.
मोटर स्पोर्ट्स विभागात प्रथमच भारतीय महिलेने बाजी मारली आहे. दुबईत झालेल्या पहिल्या फेरीत 23 वर्षीय ऐश्वर्याने बाजी मारली होती. त्यानंतर पोर्तुगाल (तिसरे), स्पेन (पाचवे) आणि हंगेरी (चौथे) येथे झालेल्या स्पर्धेत साजेशी कामगिरी करताना 65 गुणांची कमाई केली.
अवघ्या चार गुणांच्या फरकाने ऐश्वर्याने महिला गटाचे जेतेपद पटकावले. कनिष्ठ गटात तिला 46 गुणांसह दुसर्या स्थानावर समाधान मानावे लागले.
हंगेरीच्या टप्प्यात सहभागी होण्यापूर्वी ऐश्वर्या (52) आणि व्हिएरा (45) यांच्यात जेतेपदासाठी कडवी टक्कर होती, पण ऐश्वर्याने चौथे स्थान पटकाविताना 13 गुणांची कमाई केली, तर व्हिएराने तिसर्या स्थानासह 16 गुण कमावले.