Breaking News

खारघरमध्ये चेन स्नॅचर सक्रिय

तीन महिलांचे मंगळसूत्र लंपास

पनवेल ः प्रतिनिधी

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असताना दुसरीकडे चोरटे मात्र पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. रविवारी (दि. 16) तीन ज्येष्ठ नागरिक महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र बाइकस्वारांनी लंपास केले. भाजी खरेदीसाठी बाहेर पडणार्‍या या महिलांना दुचाकीस्वारांनी आपले शिकार बनविले आहे.

पहिली घटना सेक्टर 19 या ठिकाणी घडली. महालक्ष्मी माणिकन (60) या सेक्टर 18, सुयश हाईट्समधील रहिवासी भाजी खरेदीसाठी बाहेर पडल्या होत्या. या वेळी घरापासून 500 मीटर अंतरावर राजे रेसिडेन्सीच्या गेटजवळ सफेद लाल रंगाच्या मोटरसायकलवरून आलेल्या काळ्या रंगाचे हेल्मेट परिधान केलेल्या बाइकस्वाराने माणिकन यांना जोरात हिसका देऊन त्यांच्या गळ्यातील 60 हजार किमतीचे मंगळसूत्र घेऊन पोबारा केली. ही घटना सकाळी 11 वाजता घडल्यावर अशाच प्रकारची पुनरावृत्ती सेक्टर 12मध्ये सुष्मा जाधव (62) यांच्यासोबत 11.45 वाजता घडली. जाधव यांच्या गळ्यातील 30 हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी दुचाकीवरून हिसकावून पोबारा केला. तिसरी घटना विनोदिनी रंगनाथन (62) यांच्याबाबत 12.20 वाजता घडली. या घटनेत रंगनाथन यांचे 60 हजार किमतीचे मंगळसूत्र सदर दोन घटनांप्रमाणे दुचाकीस्वाराने लंपास केले. विशेष म्हणजे तिन्ही घटनांत चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिक महिलांना आपले शिकार बनविल्याचे उघड झाले आहे. दोन तासांच्या अवधित सुमारे एक लाख 50 हजारांची चोरी चोरट्यांनी केली. संबंधित घटनेची खारघर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनांमुळे निर्माण झाला आहे. संबंधित घटनेचा तपास खारघर पोलीस करीत आहेत. आम्ही घटनास्थळावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. काही सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद झाले आहेत. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. शहरात पेट्रोलिंगदेखील वाढविण्यात आल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी दिली.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply