Breaking News

भोगाव खुर्दमध्ये जवानाकडून ध्वजारोहण

पोलादपूर ः प्रतिनिधी

तालुक्यात स्वातंत्र्यदिनासोबत रक्षाबंधनाचा दुहेरी आनंद गावागावांतून पाहण्यास मिळाला. भोगाव खुर्द ग्रामपंचायतीत सरपंच राकेश उतेकर यांनी ध्वजारोहणाचा मान यंदा भारतीय सैन्यातील जवानास देऊन आगळावेगळा पायंडा पाडला, तर गोळेगणी शाळेने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सर्व माजी सैनिकांचा गौरव केला.

तालुक्यातील राजकीय स्थित्यंतराने गाजलेली ग्रुप ग्रामपंचायत भोगाव खुर्द येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय सैन्यात कार्यरत असणारे जवान सागर सुरेश कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यामागे सोशल मीडियावर राजकीय व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण करण्याऐवजी भारतीय सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याच्या पोस्ट सातत्याने वाचण्यात आल्याने हा बदल प्रत्येक गावागावात व्हावा, या हेतूने भोगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच राकेश उतेकर आणि ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला.

तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायती, तलाठी सजा, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, महाविद्यालय, पंचायत समिती, नगरपंचायत, पोलादपूर पोलीस ठाणे तसेच विविध शासकीय कार्यालयांत स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण झाल्यानंतर सामुदायिक ध्वजारोहणाचा प्रमुख कार्यक्रम पोलादपूर तहसील कार्यालय येथे आयोजित करण्यात आला. पोलादपूर तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहणाला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी मानवंदना दिली. या वेळी प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयातर्फे पोलीस कर्मचार्‍यांना राख्या बांधण्यात आल्या. या वेळी नगरसेविका आणि भाजपच्या महिला पदाधिकार्‍यांनीही पोलिसांना ओवाळले.

गोळेगणीत माजी सैनिकांचा गौरव आणि पूरग्रस्तांना निधी

रायगड जिल्हा परिषदेच्या गोळेगणी शाळेला स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे यांच्या प्रयत्नातून शैक्षणिक कार्यांतर्गत ग्रामस्थांनी लोकसहभागातून 90 हजारांची भेट दिल्यानुसार शाळा प्रवेशद्वार, ध्वजस्तंभ व 850 स्क्वेअर फूट पेव्हर ब्लॉकचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर शाळेतर्फे सुभाष मोरे, सहदेव येरुणकर, बळीराम येरुणकर, आत्माराम मोरे, श्रीनिवास येरुणकर या माजी सैनिकांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. सुभाष मोरे यांनी याप्रसंगी शाळेला पाच हजारांची देणगी दिली. शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या ग्रामस्थांनी खरेदी केल्यानंतर त्या रकमेसह खाऊच्या पैशांतून 2500 रुपयांची सर्व मदत कोल्हापूर, सांगलीच्या पूरग्रस्तांना देण्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply