औरंगाबाद : स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजावंदन सोहळ्यासाठी शाळेत जात असताना नऊ वर्षीय विद्यार्थ्याला भरधाव कारने चिरडले. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. झाल्टा फाटा येथे गुरुवारी सकाळी ही घटना घडली. संभाजी शिंदे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. शाळेतील ध्वजावंदन सोहळ्यासाठी संभाजी निघाला होता. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारणार होता, मात्र शाळेकडे जात असतानाच त्याला मृत्यूने गाठले. या अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघातामुळे नागरिक संतापले असून, रस्त्यावर उतरले. त्यामुळे झाल्टा फाटा ते केंब्रिज रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सर्व वाहतूक बीड बाह्यवळण रस्त्यावरून वळवण्यात आली आहे.
सेक्स रॅकेट उद्ध्वस्त
गुरुग्राम ः पालम विहार येथील अंसल प्लाझा मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला अवैध शरीरविक्रीचा गोरखधंदा पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. पोलिसांना अंसल प्लाझा मॉलमध्ये स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी सापळा रचून छापा टाकण्यात आला. या कारवाईत जवळपास 25 जणांना अटक करण्यात आली. त्यात 15 महिलांचा समावेश आहे. संशयितांसह स्पा मालकाविरोधात पालम विहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथे पोलीस एक ग्राहक बनून गेला होता, तसेच स्पा सेंटरबाहेर इतर पोलिसांना सापळा लावला होता. स्पा सेंटरमध्ये गिर्हाईक बनून गेलेल्या पोलिसाला रूममध्ये महिला पुरुषांना मसाज करीत असून आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्या. पोलिसाला सेक्स रॅकेटबाबत सुगावा लागताच त्याने बाहेर असलेल्या पोलीस पथकाला याबाबत टीप दिली. त्यानुसार पोलिसांनी या स्पा सेंटरवर छापा टाकत 25 जणांना अटक केली, अशी माहिती गुरुग्राम पोलिसांचे प्रवक्ते सुभाष बोकन यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांनी बांधल्या राख्या
नवी मुंबई ः वाहतुकीचे नियम मोडणार्या दुचाकी आणि चारचाकी प्रवाशांना शाळेतील विद्यार्थ्यांनी राख्या बांधल्या. विनाहेल्मेट दुचाकीस्वार, सीटबेल्ट न लावणार्या चारचाकी वाहनचालकांना तसेच वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणार्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जनजागृती करण्यासाठी एपीएमसी आणि तुर्भे वाहतूक पोलिसांनी शाळकरी विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधनानिमित्त अनोखा कार्यक्रम हाती घेतला. शाळकरी विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम मोडणार्यांना राखी बांधून वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश दिला आहे. एपीएमसी मार्केट ते तुर्भे रोडदरम्यान वाहतूक पोलिसांनी हा कार्यक्रम राबवला. या रोडदरम्यान प्रवास करणार्या वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यास सांगून नियम मोडणार्यांना विद्यार्थ्यांनी राख्या बांधल्या. एपीएमसी आणि तुर्भे वाहतूक पोलिसांच्या वतीने तुर्भे येथील डॉ. सीताराम विश्वनाथ सामंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हा अनोखा रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला.