विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्लेषण
मुंबई ः प्रतिनिधी
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला असला, तरी तीन पक्षांच्या महाआघाडीविरुद्ध आम्हाला मिळालेल्या मतांवर समाधानी आहोत. अतिशय मोठ्या प्रमाणात आमच्याकडे मतदार वळलेला आहे. आम्ही वारंवार जे सांगत होतो की ही जी पोकळी आहे ती आम्ही भरून काढत आहोत. ती कोल्हापुरातही भरून काढल्याचे दिसून आले, अशी प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही आता एकटे लढलो तरी जेव्हा भाजप आणि शिवसेना एकत्र लढलो होतो त्यापेक्षा जास्त मते आहेत. ते तिघे लढले तरी त्यांची मते वाढलेली नाही. आताचे मत हे सहानुभूतीचे मत आहे. त्यामुळे 2024मध्ये ही जागा आम्ही 100 टक्के जिंकणार याबद्दल माझ्या मनात खात्री आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे हे अयोध्या दौर्यावर जाणार आहेत. याशिवाय पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचादेखील अयोध्या दौरा लवकरच असणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले की, अयोध्येचा दौरा हा कोणीही करायला हरकत नाही, कारण प्रभू श्रीराम हे आपले दैवत आहे आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी जर कोणी जाणार असेल, तर त्यांचे स्वागतच आहे. आम्हीदेखील त्या ठिकाणी जात असतो आणि मला असे वाटते की कुठल्याही व्यक्तीला तिथे जावसे वाटणे यामध्ये काही गैर नाही. प्रभू श्रीरामांचे इतके मोठे मंदिर हे त्या ठिकाणी होतेय. त्याची भव्यता पाहण्याची इच्छा आणि प्रभू श्रीरामाची दर्शन घेण्याची इच्छा ही स्वाभाविक आहे.
‘संजय राऊतांना काही कामधंदा नाही’
महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे, शिवाय अन्य मुद्द्यांवरूनही टीका केली आहे. यावर बोलताना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी, संजय राऊत हे निराश व्यक्ती आहेत. ते दिवसभरात काहीही बोलत असतात. कितीवेळा आम्ही उत्तरे द्यायची. आम्हाला कामधंदे आहेत. त्यांना नाहीत, असा टोला लगावला.