Breaking News

आधी सरकार चालवून तर दाखवा!

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

मुंबई : प्रतिनिधी
माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडा, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ’सामना’तील मुलाखतीमध्ये दिले होते. त्यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. वारंवार म्हटले जाते की आमचे सरकार पाडून दाखवा. पाडणे सोडून द्या. आम्हाला त्यात रस नाही. माझे तुम्हाला आव्हान आहे की, सरकार चालवून तर दाखवा, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
भाजप प्रदेश राज्य कार्यकारिणीची बैठक सोमवारी (दि. 27) झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीस राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा दिल्लीतून, फडणवीस यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, चित्रा वाघ आदी मुंबईच्या वसंत स्मृती कार्यालयातून, तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापुरातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या वेळी राज्य सरकारवर टीका केली. आपल्या अपयशावरून लक्ष हटवण्यासाठी वारंवार सरकार पाडण्याचा प्रयत्न असल्याचे तुणतुणे वाजवले जात आहे. आम्हाला सरकार पाडण्यात रस नाही. तुम्ही एकमेकांच्या तंगड्या तोडण्यास सक्षम आहात. अंतर्विरोधानेच सरकार पडेल. त्यानंतर महाराष्ट्राचे भवितव्य काय ठरवून दाखवू, असे फडणवीस म्हणाले.
महाविकास आघाडीचे सरकार तीन चाकी असले तरी या सरकारचे स्टेअरिंग माझ्याच हातात आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी शेरेबाजी केली. ते म्हणाले की, ऑटो रिक्षाचे स्टेअरिंग उद्धवजी यांच्या हातात आहे हे खरे आहे, पण ते एक गोष्ट विसरले की रिक्षा कुठे जाईल हे चालक ठरवत नाही तर त्यामध्ये बसलेले प्रवासी ठरवतात. प्रवाशांनी ठरवलेल्या ठिकाणी रिक्षा गेली नाही तर चालकाला रोजगारही मिळत नाही. या रिक्षात बसलेल्या प्रवाशांचेही समजत नाही, एक जण उत्तरेकडे जा म्हणतो, दुसरा दक्षिणेकडे चला म्हणतो. मध्येच कोणीतरी ब्रेक मारतो, कोणीतरी हॉर्न वाजवतो. त्या रिक्षाची परिस्थिती अशी झालीय की नेमके कुठल्या दिशेला आणि कोण घेऊन चाललेय हे ठरवता येत नाही. यामुळे नुकसान जनतेचे होत आहे.
या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. फडणवीस म्हणाले, त्या मुलाखतीमध्ये विद्वान संपादक जे राज्यसभेचे सदस्यही आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले की, मी साखर उद्योगाचे प्रश्न घेऊन अमित शाह यांना कशासाठी भेटलो. आता यांना इतकेही माहिती नाही की साखर उद्योगाला मदत देण्यासाठी केंद्रात जो मंत्रिगट तयार झाला, त्याचे अध्यक्ष अमित शाह आहेत. त्यामुळे त्यांना भेटलो. शरद पवार यांनीसुद्धा साखर उद्योगासंबंधात पत्रे लिहिली आहेत, ती काही आदेश बांदेकरांना नाही लिहिलेली. ती त्यांनी अमित शाह यांनाच लिहिली आहेत. आता हे जर सरकारमधील नेतृत्वाला आणि संपादकांना माहिती नसेल तर शेतकर्‍यांचे काय होणार, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरूनही फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यात टेस्टिंग होत नाही. यामुळे मृत्यूदर आटोक्यात येत नाही. मुंबईत मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या तर महिनाभरात परिस्थिती नियंत्रणात येईल तसेच पुण्यात टेस्टिंग वाढल्यास रुग्ण वाढले तरी याचा फायदा पुण्याला होणार आहे, पण पुण्यावर अन्याय होत आहे. आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी एक पैसा अनुदान पुणे, पिंपरी-चिंचवडला दिलेला नाही, असा आरोपही फडणवीस यांनी केला.
फडणवीस पुढे म्हणाले की, एमएमआर परिसरात संकट मोठे आहे. आम्ही 25 कोविड सेंटरला भेटी दिल्या. तेथे अतिशय वाईट अवस्था आहे. क्वारन्टाईनमध्ये महिला सुरक्षित नाहीत. महिलांसादर्भात राज्य सरकारने दिशा स्पष्ट तयार करावी ही आमची मागणी आहे.
महाविकास आघाडीचे सरकार जनतेने निवडून दिलेले नाही. हे बेईमानीने आलेले सरकार आहे. जनेतेने आम्हाला आणि सोबत असणार्‍या पक्षाला निवडून दिले होते असे सांगून, भाजपचा डीएनए संघर्षाचा असून, जनतेसाठी संघर्ष करीत राहू, असेही ते म्हणाले.
कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्रातील सरकार अपयशी -नड्डा
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या स्वार्थासाठी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. या सरकारमध्ये अंतर्विरोध आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात हे सरकार अपयशी ठरलेले असून, ते लोकांसमोर आणले पाहिजे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले. भाजपने आपला विस्तार करण्यावर लक्ष दिले पाहिजे. पुढच्या वेळी एकट्याने महाराष्ट्र सांभाळण्याची आपली तयारी असली पाहिजे. यासाठी आजपासूनच कामाला लागा, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Leave a Reply