Breaking News

रॅगिंग रोखायलाच हवे

भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील रॅगिंग हे एक अस्वस्थ करणारे कटु वास्तव आहे. गेल्या काही वर्षांत रॅगिंग पोटी कितीएक अजाण विद्यार्थ्यांचा बळी गेला असला व कित्येक हुशार विद्यार्थ्यांची करिअर्स त्यामुळे अद्धवस्त झाली असली तरी आजही कित्येकांचा रॅगिंगसंदर्भातला दृष्टिकोन हे तर चालायचंच छापाचा असतो.

उत्तर प्रदेशातील सैफई येथील आयुर्विज्ञान विद्यापीठातील एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाच्या 150 विद्यार्थ्यांच्या रॅगिंगचा व्हिडिओ काल देशभरातील जनतेच्या भुवया उंचावून गेला. उंचेपुरे असे हे दीडशे तरुण मुंडण केलेल्या अवस्थेत रस्तावरून पांढरे कपडे परिधान करून मुजरा घालत रांगेने चालताना या व्हिडिओत दिसले. विद्यापीठात नव्यानेच प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या या विद्यार्थ्यांना वरिष्ठ विद्यार्थ्यांनी डोके पूर्ण भादरायला भाग पाडले होते व त्यानंतर पाठीवर सॅक घेऊन रस्त्याने मुजरा करीत हे विद्यार्थी विद्यापीठाच्या आवारात रांगेने पुढे सरकताना दिसत होते. हा व्हिडिओ काल देशभरात व्हायरल झाल्यावर वैद्यकीय शिक्षण देणार्‍या संस्थांमधील रॅगिंगच्या समस्येच्या चर्चेने पुन्हा एकदा डोके वर काढले. त्यात या विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंनी या घटनेचे सौम्य स्वरुपाचे रॅगिंग अशा शब्दांत वर्णन करून हा तर विद्यापीठातील संस्कारांशी त्यांचा परिचय करून देण्याचा प्रकार आहे. एक तर्‍हेची अशी परंपराच तिथे आहे. ज्या वरिष्ठ विद्यार्थ्यांनी या नव्या विद्यार्थ्यांना मुंडण करण्यास भाग पाडले आहे, तेच वरिष्ठ विद्यार्थी उद्या त्यांना प्रशिक्षण देतील, त्यांना अभ्यासात मार्गदर्शन करतील वा प्रसंगी प्रेमाने खाऊ-पिऊ देखील घालतील, असेही कौतुकोद्गार काढून या प्रकुलगुरुंनी सगळ्यांनाच अचंबित केले आहे. संस्थेतील संस्कृतीशी तोंडओळख करून देण्याचा हा एक भाग असतो, त्यादृष्टीने काही संस्कार रॅगिंगमार्फत केले जातात, वरकरणी कठोर भासणार्‍या या अनुभवामुळे ते विद्यार्थ्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतात, वगैरे वगैरे दावे करणारी मंडळी अनेकदा दिसून येतात. हीच मंडळी रॅगिंगचे सौम्य स्वरुपाचे रॅगिंग व टोकाचे, हिंसक स्वरुपाचे रॅगिंग असे दोन प्रकार मानताना दिसतात. कथित सौम्य स्वरुपाच्या रॅगिंगला काही जणांची हरकत नसते. परंतु वरील घटनेत पाहिले तरी अशातर्‍हेने जबरदस्तीने केसांचे मुंडण करणे कुणी कुणाला कशासाठी भाग पाडावे? एमबीबीएसकरिता येणार्‍या विद्यार्थ्यांवर मुळातच अभ्यासाचे, प्रवेशाचे, शैक्षणिक खर्चाचे, घरापासून दूर राहण्याचे असे अनेक प्रकारचे ताण आधीच असतात, त्यात आणखी रॅगिंगच्या अनुभवाची भर पडल्यास एखादा कमकुवत मनाचा विद्यार्थी ताणापोटी कोलमडून पडू शकतो. खेरीज, या अशा घटना शिक्षणासाठी आपल्या पाल्याला दूरच्या गावी राहायला पाठवणार्‍या पालकांकरिता खूपच ताण देणार्‍या ठरू शकतात. सतत मग अशा घटनांच्या दबावाखाली राहणे त्यांना भाग पडू शकते. यात आश्चर्याची बाब म्हणजे आशियाई शैक्षणिक संस्थामध्येच रॅगिंगच्या या घटना आढळतात. युरोप-अमेरिकेत असे प्रकार फारसे दिसत नाहीत. किंबहुना आपल्याकडे ते जितक्या व्यापक स्तरावर घडतात तसे तर कुठेच आढळत नाही. या असल्या प्रकारांची सुरूवात भारतात नेमकी कधी झाली कुणास ठाऊक? परंतु सर्वोच्च न्यायालयाने ठाम भूमिका घेतल्यापासून रॅगिंगचे प्रमाण काहिसे कमी नक्कीच झाले आहे. परंतु तिला पूर्ण अटकाव मात्र झालेला नाही. तो व्हावा याकरिता त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णत: बदलण्याची गरज आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply