Breaking News

आगरदांडा, खोरा बंदरामुळे पर्यटनाला गती

भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात व केंद्रात विराजमान झाल्यापासून मुरूड तालुक्यातील तीन महत्त्वाच्या बंदरांना कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाल्याने पर्यटक व स्थानिक नागरिकांना मोठी सुविधा मिळाली आहे. केंद्र शासनाच्या सेतू व वाडी जोड प्रकल्पांतर्गत मुरूड तालुक्यातील तीन बंदरांना मोठा निधी मिळाला व या भागाचा विकास होण्यास मोठी मदत झाली. भारतीय जनता पार्टीच्या सरकारने महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या असणार्‍या जेट्ट्या सक्षमीकरण करून वरील दोन योजनांतर्गत मोठा निधी प्राप्त करून दिल्याने रायगडसह इतर महत्त्वाच्या बंदरांचा विकास करता आला.

मुरूड हे पर्यटनस्थळ असून येथे ऐतिहासिक सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी वर्षाला पाच लाख लोक ये-जा करीत असतात. अशा वेळी नवीन जेट्ट्या निर्माण झाल्याने पर्यटकांना मोठी सुविधा प्राप्त झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या अगोदर असणार्‍या कोणत्याही सरकारने बंदर जोडो अभियानावर विशेष लक्ष दिलेले आढळून येत नाही. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड जे त्यांना लेव्हीद्वारे उत्पन्न मिळत असे त्यावरच जेट्ट्यांचे नूतनीकरण झाले, परंतु नवीन जेट्ट्या निर्माण झाल्या नाहीत. त्यामुळे फारसा विकास होऊ शकला नाही.

परंतु विद्यमान भाजप सरकार चाणाक्षपणे काम करीत असून नवीन जेट्ट्या उभारणे, रोरो सेवा, जंगल जेट्टी, स्पीड बोट, समुद्राच्या मध्यभागी भव्यदिव्य समुद्री वाहतुकीसाठी चालना देणे अशा विविध बाबींवर खर्च करण्यासाठी कोट्यवधींच्या मोठ्या रकमेची तरतूद केल्याने आज मोठा विकास होऊन दोन शहरांतील अंतर कमी होऊन प्रवासासाठी लागणारा वेळ वाचला व इंधन बचत तसेच लोकांना येणार प्रवास खर्चसुद्धा कमी झाला आहे. ही भाजप सरकारची जमेची बाजू असून बंदरावर विकासासाठी आजपर्यंत एवढा निधी कोणत्याच सरकारने केलेला नाही.

मुरूड तालुक्यात महत्त्वाचे असे आगरदांडा, राजपुरी व खोरा बंदर असून या तिन्ही बंदरांतील जेट्ट्या नवीन बांधणे, येथे पर्यटकांच्या गाड्या पार्किंगसाठी वाहनतळ उभारणे, भरतीचे पाणी जेट्टीपासून दूर रहावे यासाठी दगडाची संरक्षक भिंत उभारणे, मोठमोठ्या होड्या अथवा ट्रॉलर्स बंदरावर सहजपणे नांगरता यावेत यासाठी समुद्रातील गाळ काढणे, मच्छीमारांना मासळी सुकवण्यासाठी काँक्रिटचे ओटे बनवणे अशी विविध कामे या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आहेत. आजपर्यंत तिन्ही जेट्ट्यांसाठी सुमारे 150 कोटींच्यावर खर्च करण्यात आलेला असून विविध सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.   आगरदांडा व दिघी येथे नुकताच करोडो रुपयांचा निधी खर्च करून मोठी जेट्टी विकसित करण्याचे काम पूर्ण झाल्याने येथे जंगल जेट्टी सुरू झाल्याने लोकांच्या चारचाकी गाड्या अगदी सहजपणे ये-जा करता येऊ लागल्याने रायगड व रत्नागिरीतील मंडणगड तालुके एकमेकांना जोडले गेले आहेत.

त्याचप्रमाणे राजपुरी येथे नवीन जेट्टी व वाहनतळ उभारले गेल्याने जंजिरा किल्ल्यावर जाणे सोपे झाले आहे. शेकडो पर्यटकांच्या चारचाकी गाड्या वाहनतळावर सहज पार्किंग करता येत आहेत. त्याचप्रमाणे खोरा बंदराचासुद्धा विकास करण्यात आला आहे. येथेसुद्धा समुद्रातील गाळ काढणे, वाहनतळ विकसित करणे, दगडाची संरक्षक भिंत बांधणे, मेरीटाइम बोर्डाचे नवीन कार्यालय बांधणे, पेव्हर ब्लॉक बसवणे आदी कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

मुरूड तालुक्यातील या तीन महत्त्वाच्या बंदरांचा विकास झाल्याने पर्यटकांची वृद्धी होत असून स्थानिक नागरिकांना चांगल्या सुविधा प्राप्त झाल्या आहेत. लोकांच्या प्रवासाचा वेळ व तिकीट शुल्कसुद्धा माफक पडत असल्याने समस्त जनता समाधान व्यक्त करीत आहेत.राजपुरी व खोरा बंदरातून जंजिरा किल्ला वाहतूक केली जाते, तर आगरदांडा येथून दिघीपर्यंत वाहतूक होत असल्याने आणि जंगल जेट्टीची सुविधा प्राप्त झाल्याने रत्नागिरी व रायगड दोन तालुके एकमेकांना जोडले गेले आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, भारतीय जनता पार्टीच्या कालावधीत मुरूडमधील तीन बंदरांना कोट्यवधींचा निधी मिळाल्यामुळे विकास साध्य झाला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण हे लोकांना सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असून, या राज्यात अधिक चांगला विकास होणार असल्याचे संकेत या वेळी त्यांनी दिले. बंदर विकासाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांच्याशी संपर्क साधला असताते म्हणले की, मागील तीन वर्षांत केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेंतर्गत, राज्य शासनाच्या बंदरांसाठी असणार्‍या सुख सोयीअंतर्गत, त्याचप्रमाणे रस्ते आणि रेल्वे जोडणी व ब्रेक वॉटर अशा विविध योजनेअंतर्गत मुरूड येथील तिन्ही बंदरांच्या विकासासाठी निधी उपलब्ध झाला आहे. मागील तीन वर्षांत उपलब्ध निधीच्या माध्यमातून मांडवा जेट्टीचे नूतनीकरण करणे हे काम पूर्ण झाले आहे.

करंजा रोरो जेट्टी हेदेखील काम पूर्णत्वाकडे आहे. त्याचप्रमाणे रेवस, मोरा आणि काशीद येथील रोरो सेवा पॅसेंजर जेट्टी अशी कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन मंडळाचा निधी आणि महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडील निधी विविध कामांसाठी खर्च करण्यात आल्याची माहिती या वेळी त्यांनी दिली.

मुरूड येथील बंदर निरीक्षक हितेंद्र बारापत्रे यांनी सांगितले की, आगरदांडा, राजापुरी आणि खोरा बंदरातील नवीन जेट्ट्या बनल्यामुळे प्रवासीवर्गाला अगदी सहज प्रवास करणे सोपे झाले असून, पर्यटकांना सुरक्षितता प्राप्त झाली असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. राजापुरी, आगरदांडा आणि खोरा बंदरांच्या विकासामुळे प्रगतीचे मोठे दालनच खुले झाले असून लवकरच येथे जेएनपीटीचे मोठे बंदर विकसित होणार असल्याने एक मोठी ऑडियोगिक क्रांती या भागात झाल्याचे दिसून येणार आहे.

-संजय करडे, खबरबात

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply