चेन्नई : वृत्तसंस्था
सांघिक खेळाचे शानदार प्रदर्शन केलेल्या बंगाल वॉरियर्सने पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या पटणा पायरेट्सचा 35-26 असा पराभव करून प्रो कबड्डी लीगमध्ये विजयी आगेकूच केली. या दमदार विजयासह बंगालने गुणतालिकेत 33 गुणांसह दुसर्या स्थानी झेप घेतली असून, पटणा संघ 17 गुणांसह तळाला आहे. पटणाने नऊ सामन्यांतून सहा पराभव पत्करले आहेत.
जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात बंगालचा मनिंदर सिंग आणि पटणाचा ‘रेकॉर्ड ब्रेकर’ प्रदीप नरवाल यांच्यामध्ये अपेक्षित लढाई रंगली. दोघांनी आपापल्या संघांसाठी तुफानी चढाया करताना ‘सुपर टेन’ कामगिरी केली. मनिंदरने 10 गुण, तर प्रदीपने 12 गुणांची कमाई केली, मात्र फरक राहिला तो सांघिक खेळाचा. एकीकडे पटणाचा प्रदीप एकामागून एक गुणांची वसुली करीत असताना त्याला सहकारी खेळाडूंकडून अपेक्षित साथ मिळाली नाही.
स्पर्धा इतिहासामध्ये मनिंदरने 26व्यांदा सुपर टेन कामगिरी केली, तर त्याचवेळी प्रदीपने तब्बल 48व्यांदा असा पराक्रम केला. दुसरीकडे मनिंदरला आपल्या सहकारी खेळाडूंकडून मोलाची साथ मिळाली. के. प्रपंजन (6) आणि रिंकू नरवाल (5) यांनीही शानदार खेळ करताना संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. रिंकूने भक्कम पकडी करताना पायरेट्सचे आक्रमण खिळखिळे केले.
मध्यंतराला बंगालने 15-14 अशी नाममात्र आघाडी घेतली होती. यानंतर तुफानी खेळ करीत बंगालने पटणाच्या आव्हानातली हवा काढली. प्रदीपने तुफानी खेळ केला, मात्र सांघिक खेळाचा अभाव पायरेट्सच्या पराभवास कारणीभूत ठरला.