Breaking News

जल्लोश हवा, उन्माद नको

मुंबापुरीतील मराठी संस्कृतीचा दहीहंडी हा गणेशोत्सवाइतकाच ठळक घटक आहे. परंतु गेली काही वर्षे मात्र ट्रकमधून घोळक्याने जाणारे गोविंदा कालबाह्य व केविलवाणे दिसू लागले आहेत. इतर मंडळी आपापले कामाधंद्याचे दिनक्रम पार पाडण्यात मश्गुल असताना यांनी मात्र जिवाची जोखीम पत्करून दहीहंड्या फोडत शहरभर भटकायचे. उसने अवसान आणण्यासाठी प्रसंगी दारूचाही आधार घ्यायचा. या अशा गैरप्रकारांना न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांमधून कुठले योग्य वळण लागायला. तेे परिस्थितीच्या रेट्यापोठी यथावकाश मागे पडेल तेव्हाच खरे.

गेली काही वर्षे सातत्याने चुकीच्या कारणांसाठी चर्चेत राहणारा दहीहंडी उत्सव यंदाही चर्चेत आहे तो चुकीच्याच कारणासाठी. गेल्या काही वर्षांपासून या उत्सवाला उतरती कळा लागली आहे. अविवेकी स्पर्धेतून दहीहंड्यांची अंची वाढत गेली आणि त्यातल्या मौजमजेऐवजी त्यातली बक्षिसांची रक्कम मोठी ठरू लागली. सोबतच दहीहंडीला बट्टा लागू लागला तो त्या दरम्यान होणार्‍या अपघातांचा. उत्सवापाठोपाठ समोर यायच्या त्या जखमी गोविंदांच्या करुण कहाण्या. अखेर न्यायालयाला हस्तक्षेप करून दहीहंडीतील गैरप्रकारांना अटकाव करावा लागला. अर्थात त्याचा लगेचच काही मोठा परिणाम झाला असेही नाहीच. अजूनही नऊ थराच्या हंडीची शेखी मिरवली जातेच. दहीहंडीभोवतीचे सामाजिक वास्तव हलकेहलके बदलत मात्र चालले आहे. या उत्सवाची अवघी मदार ज्या निम्न मध्यम वर्गीय मराठी तरुणांवर होती त्याच्या जगण्याचा पोत काळाच्या ओघात बदलू लागला आहे. गेल्या दशकभरात या वर्गातील मराठी तरुण मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षण व पांढरपेशा नोकरीकडे वळू लागला. त्याच्या जगण्यातील प्राधान्यक्रम, ताणतणाव, मौजमजेच्या व्याख्या बदलू लागल्या. त्यातूनच या रांगड्या उत्सवाबद्दलचा त्याचा उत्साहदेखील मावळू लागला आहे. तर अशा विविध कारणांमुळे गोविंदापथकांना आता नव्या दमाचे तरुण गोविंदा मिळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. यंदा हा बदल ठळकपणे अधोरेखित होतो आहे इतकेच. संबंधित वर्तुळातील कार्यकर्त्यांच्या मते, यंदा जवळपास दीडशे ते दोनशे गोविंदापथकांनी या उत्सवातून माघार घेतली आहे. अनेक ठिकाणी यंदा सरावाच्या काळातच पथकांना तरुणांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवू लागली. गिरणगावातून खरे तर आजवर शहरभर गोविंदापथके दहीहंडी फोडायला रवाना व्हायची. परंतु त्या नावाजलेल्या गोविंदापथकांनाही आता गोविंदांची उणीव भासू लागली आहे. मराठी माणूस मोठ्या प्रमाणात शहरातून दूरवरच्या अपनगरांत स्थलांतरीत झाल्याचाही यात मोठा वाटा आहे. अन्यत्र रहावयास गेल्यानंतरही आपल्या मूळ घराजवळच्या पथकात सामील होणारे गोविंदाही आता तिकडे फिरकेनासे झाले आहेत तर काही उच्च शिक्षण व नोकरीधंद्यामुळे त्याविषयी उत्सुक नाहीत. एका परीने हे बरे झाले असेही म्हणता येईल कारण हकनाक कुणी तरुण या उत्सवातील गैरप्रकारांमुळे आयुष्यभरासाठी अपंग होण्यापेक्षा निदान गोविंदांच्या अपुर्‍या संख्येमुळे आता दहीहंडीची उंची आटोक्यात राहण्यास मदत व्हावी. पारंपरिक खेळ टिकावा, त्यातला जोश अबाधित रहावा, परंतु तिला उन्मादाचे स्वरुप मात्र येऊ नये असेच कुठल्याही सुजाण नागरिकाला वाटेल. बदलत्या परिस्थितीत या उत्सवाची रंगत टिकून रहावी व त्यातील गैरप्रकारांना आळा बसावा हीच सदिच्छा!

Check Also

शिर्डीतील साईबाबांच्या पादुकांचा पनवेलमध्ये दर्शन सोहळा

नियोजन बैठकीत तयारीचा आढावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल परिसरातील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 18 …

Leave a Reply