पनवेल ः रामप्रहर वृत्त
गणेशोत्सवासाठी अवघे मोजकेच दिवस उरले असल्याने पनवेलमधील बाजारपेठा मखर, सजावट व पूजेच्या साहित्याने फुलल्या आहेत. थर्माकोल बंदी असल्याने आता कापडी मखरांबरोबर लाकडी मखर मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून विविध रंगसंगती व नक्षीकामांमुळे ते ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.
घरगुती गणपतींसाठी आकर्षक मूर्तीबरोबर सजावट व विद्युत रोषणाईवर गणेशभक्त विशेष भर देत असून प्रामुख्याने मखराला प्राधान्य दिले जाते. मात्र, गेल्या वर्षीपासून थर्माकोल मखरावर बंदी घालण्यात आली असल्याने मागीलवर्षी कापडी मखर अधिक प्रमाणात उपलब्ध होते. आता लाकडी प्लायवूड व त्यावर कापडी आवरण असलेले मखर आले आहेत. त्याचबरोबर लोखंडी स्टॅण्ड व त्यावर कापडी फुलांची सजावट असलेले मखरही आहेत. लाकडी मखर एक हजार 900 रुपये ते 12 हजारांपर्यंत आहेत. गणेशभक्तांकडूनही या पर्यावरणपूरक मखरांना मागणी मोठ्या प्रमाणात करत आहेत. मखराबरोबर सजावटी साहित्यात कापडी फुले, ग्रास म्याट व फ्लॉवरपॉटला ग्राहक अधिक पसंती देत आहेत. कापडी फुलांच्या माळा 300 ते 800 रुपये तर ग्रास मॅट 40 ते 50 चौरस फूट व फ्लॉवरपॉट 120 रुपये ते 500 रुपयांपर्यंत आहेत.