Breaking News

काश्मीर प्रश्नातील गमतीची गुंतागुंत

अनुच्छेद 370 रद्द केल्यामुळे काश्मीरचे उर्वरित भारताशी मनोमीलन होण्याचा प्रश्न जवळजवळ सुटल्यात जमा झाला असून आता प्रश्न आहे तो पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानकडून हिसकावून परत भारतात कधी आणायचे हा, अशी सर्वसाधारण देशभक्त नागरिकांची समजूत झाली आहे. लोकांच्या मनात काही असो त्यांची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर अनुकूल ते घडते आणि प्रबळ नसेल उलट बावळट आणि उदासीन असेल तर ज्यांना प्रतिकूल घडवायचे आहे ते लोक यशस्वी होऊ शकतात. लोकांना फाळणी नको होती पण त्यांची इच्छाशक्ती तेव्हा काँग्रेसकडे गहाण पडली होती. त्यामुळे काँग्रेसला लोकांना भुलवून सोयीचे राजकारण करणे शक्य झाले. आज लोकांची इच्छाशक्ती प्रबळ आहे आणि ती आहे त्याहून अधिक प्रबळ आणि मंगलदायी व्हावी म्हणून झटणारा पंतप्रधान त्यांना लाभला आहे. नव्या भारताचे शिल्पकार असे ज्यांना म्हटले जाऊ शकेल. असे नरेंद्र मोदी लोकांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची प्रत्यक्ष पटांगणात उतरून जेवढी आस्थेवाईकपणे काळजी घेतात तेवढी अन्य पंतप्रधानाने घेतली नव्हती, असे म्हटल्यास तो कोणावर अन्याय होईल असे वाटत नाही. मातीतून संस्कृती मोठी आणि संपन्न होते आणि ती सशक्त संस्कृती सुसंवादातून प्रश्न सुटू शकतात हा विश्वास देते हा मोदींचा सिद्धांत आहे. म्हणून गुरुवारी हॉकीपटू ध्यानचंद ह्यांच्या जयंतीचे निमित्त साधून देशात ठिकठिकाणी शरीरस्वास्थ्यवर्धनाची प्रात्यक्षिके दाखविणारे आकर्षक कार्यक्रम आयोजित केले गेले. काही जागी ते स्वतः उपस्थित राहिले. लोकांची जीवनशैली सकस आणि शुभंकर घडविण्यावर आपला भर आहे हे तत्त्व त्यांनी अधोरेखित केले. हे सर्व लक्षात घेता उशिरात उशिरा पुढील वर्ष सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात निर्णायक हालचाली सुरू झालेल्या असतील असे वाटले तर ते  स्वप्नरंजन म्हणून उडवून लावता येणार नाही, तथापि आपण जसा प्रथम पाकिस्तान आणि नंतर मुखवास म्हणून काश्मीरचा भला भूप्रदेश इस्लामी मानसिकतेला भेट म्हणून प्रदान केला तसा पाकिस्तान त्याच्याकडील काश्मीरचा भाग आपल्याला देणार नाही. अखंड भारताचे अखंड पाकिस्तान करणे हे इस्लामी आक्रमकांचे ध्येय राहिले आहे आणि त्याचा अनुभव आपण गेली 70 वर्षे स्वातंत्र्यातही दुर्दैवाने घेत आहोत. मोदींच्या तटस्थ नव्हे तर व्रतस्थ विदेशनीतीने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय प्रांगणात एकाकी पडत चालल्याचे आपण पाहत आहोत, तथापि पाकिस्तानचे पक्षपाती भारतात कमी आहेत असे नाही. ते बदलू शकतात आणि बदलले जातील, पण आज ते आहेत आणि अनुच्छेद 370 रद्द करून आपण काश्मीरमधील लोकांचा पराकोटीचा विश्वासघात केला आहे अशी त्यांची आलोचना आहे. इन्सानियत, जमहूरियत आणि काश्मिरियत ह्या त्रिसूत्रीनेच म्हणजे काश्मिरी मुसलमानांना जसे हवे तसे जगू देण्यावाचून भारताकडे सुखशांतीचा दुसरा पर्याय नसल्याचे ह्या गटाला सुचवायचे आहे. काश्मीरचा प्रश्न कितीही नाही म्हटले तरी राष्ट्रवादाशी निगडित आहे आणि गंमत म्हणजे तो हिंदू राष्ट्रवादाशी निगडित नसून हिंदी राष्ट्रवादाशी निगडित आहे. मोदी हिंदी राष्ट्रवादाची सुटलेली प्राथमिक सूत्रे पुन्हा घट्ट बांधून हा गुंता सोडविण्याचा खटाटोप करीत आहेत.

भारताचा अधिकृत राष्ट्रवाद हिंदी राष्ट्रवाद आहे. त्याला इंग्रजीमध्ये इंडियन नॅशनॅलिझम म्हणता येईल. त्याचे आपल्याला साधारणपणे सांगितले जात नाहीत असे पाच टप्पे आहेत. पहिला टप्पा वर्ष 1885चा आहे. याचवर्षी काँग्रेसची स्थापना झाली आणि आपल्या पहिल्याच अधिवेशनात काँग्रेसने हिंदी

राष्ट्रनिर्मितीचा संकल्प सोडला. भारतात कोणीही हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, ज्यू नसून सर्व हिंदी म्हणजे भारतीय म्हणजे इंडियन आहेत हे ह्या नव्या राष्ट्राचे पहिले आणि अंतिम असे प्राणभूत तत्त्व आहे. दुसरा टप्पा तीन वर्षांनी येतो. वर्ष

1888मध्ये सर सय्यद अहमद ह्यांनी हिंदू आणि मुसलमान ही दोन स्वतंत्र आणि  युद्धमान राष्ट्र असून त्यांचे शांततामय सहजीवन अशक्य असल्याची घोषणा केली आणि हिंदी राष्ट्रात सामील होण्याचे नाकारले. तिसरा टप्पा लोकमान्य टिळकांच्या निधनापर्यंतचा म्हणजे 1920पर्यंतचा आहे. या 32 वर्षांत न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक यांच्यापासून गोपाळ कृष्ण गोखल्यांपर्यंत अनेक नेत्यांनी मुसलमानांना हिंदी राष्ट्राची ओढ लागावी म्हणून काय करता येईल ह्याचा विचार करून त्यादृष्टीने कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली, तथापि आपण राज्यकर्ते होतो ह्या भूमिकेतून मुसलमान बाहेर पडलेच नाहीत आणि त्यांनी युद्धमान अवस्थेत राहणे पसंत केले, तर होणारा आघात टाळण्यासाठी हिंदूंनी संघटन आणि प्रबोधन ह्यावर जोर देणारी दुसरी आघाडी जिवंत ठेवली. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू करून हिंदूंमध्ये एकत्वाची राजकीय जाणीव निर्माण केली. अव्यक्तातून बाहेर पडून सुस्पष्टपणे व्यक्त होण्यासाठी रानड्यांनी अनेकानेक व्यासपीठे उपलब्ध करून दिली. टिळकांनी लोकांना आग्रही करण्याचा विडा उचलला. टिळक असेपर्यंत काँग्रेसचे स्वातंत्र्यप्राप्ती हे पहिल्या क्रमांकाचे ध्येय होते. ते चौथ्या टप्प्यात बदलले. गांधींनी हिंदू-मुस्लिम ऐक्य प्रथम क्रमांकाचे ध्येय ठरविले. त्यानंतर अहिंसापालनाचे आणि मग स्वातंत्र्यप्राप्तीचे क्रम आले. संघटन आणि उत्सव इत्यादी मार्गांनी मुसलमानांत हिंदूंविषयी अविश्वास निर्माण होत असेल तर ते करू नये, तर मुसलमानांचे प्रश्न आपले मानून ते सोडविण्यावर हिंदूंनी शक्ती एकवटावी, असा मूलभूत स्वरूपाचा आचारविचारांत बदल करण्यात आला. त्यादृष्टीने खिलाफत आंदोलन स्वातंत्र्य चळवळीचा भाग म्हणून काँग्रेसने हाती घेतले. खिलाफतीला पाठिंबा म्हणजे भारताचे संरक्षण आणि विदेश व्यवहार धोरण इस्लामच्या हितानुसार चालविण्याला संमती होती, पण ब्रिटिशांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेत ते बसत नव्हते. म्हणून त्यांनी खिलाफत आंदोलन मोडून काढले. त्याचा राग ब्रिटिशांवर काढता येत नसल्याने मुसलमानांनी तो हिंदूंवर काढला. केरळात हिंदूंवर सर्व प्रकारचे अनन्वित अत्याचार वर्षभर मुसलमानांनी केले. हिंदू-मुस्लिम ऐक्य बिघडू नये म्हणून गांधींनी काँग्रेसला ह्या अत्याचारांचा निषेध करू दिला नाही आणि वृत्तपत्रात बातम्याही येऊ दिल्या नाहीत. ब्रिटिशांच्या राज्यात संघटित इस्लामी आतंकवादाचा हिंदूंना आलेला हा पहिला अनुभव. येथून पुढे मुस्लिम अनुनय हे काँग्रेसचे आणि स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख धोरण ठरले. चळवळ पाकिस्तानच्या दिशेने सरकू लागली. काँग्रेस अखंड भारताचे आश्वासन हिंदूंना देत राहिली आणि पाकिस्तान झाले.

पाचव्या टप्प्यात सत्तांतर झाले. ते जसे ब्रिटिशांकडून काँग्रेसकडे झाले तसे पाकिस्तानातल्या मुस्लिम लीगकडून भारतातल्या मुस्लिम लीगकडे झाले. काँग्रेसचे म्हणणे असे पडले की जरी धार्मिक उन्मादामुळे मुसलमान पाकिस्तान बनवू शकले तरी भारत धर्मनिरपेक्ष असल्यामुळे मुसलमान दुखावतील असे काही करता येणार नाही. उलट आपण खर्‍या अर्थाने सेक्युलर आहोत हे जगासमोर सिद्ध करण्यासाठी मुसलमानांना झुकते माप  द्यावे लागले तरी चालेल असे नवे धोरण ठरविण्यात आले. स्वतंत्र भारतात हिंदूंना कर्तव्य आणि मुसलमानांना अधिकार अशी श्रम विभागणी झाली. त्यातून काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला.

प्रश्न असा आहे की काश्मीरमधील मुसलमान आणि उर्वरित भारतातील हिंदू यांचे नाते काय? ते सहोदर आहेत ही वस्तुस्थिती आहे. दोघांचे धर्म वेगळे अन्यथा पूर्वज, इतिहास, भाषा, संस्कृती इत्यादी एक राष्ट्रीय होण्यासाठी आवश्यक ते समान गुणविशेष दोघांकडे भरपूर. धर्माचे वेगळेपण हा हिंदूंकडून अडसर ठरत नाही. अनुच्छेद 370 काश्मिरातील मुसलमानांना हिंदूंशी एकरूप होण्यात अडथळा ठरत होते. अनुच्छेद 370 काश्मिरी मुसलमानांना पाकिस्तानकडे ढकलत होते. मोदी त्यांना धर्म बदलायला सांगत नाहीत. ते आपलेच आहेत असे मानून भारताच्या सर्वांगीण विकासात मोदी त्यांना सामावून घेऊ पाहतात. पुढचा संघर्ष भारतातील पाकिस्तानवादी लोक आणि काश्मिरातील भारतीय बनू पाहणारे मुसलमान ह्यांच्यात होणार आहे. काश्मिरातील मुसलमान स्वतंत्र आणि युद्धमान न राहून सर सय्यद अहमद यांना खोटे पाडणार आहेत. वेळ लागेल पण हे होणार आहे. ही आपली सर्वांची परीक्षेची आणि एकजुटीची वेळ आहे.

-अरविंद विठ्ठल कुळकर्णी (मो. क्र. 9619436244)

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply