कर्जत : प्रतिनिधी
शहरातील श्रद्धा हॉटेल ते चारफाटा या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून तसेच निविदा काढून बरेच दिवस झाले. मात्र रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही. ते काम त्वरित सुरू करावे यासाठी त्या भागातील नगरसेवक व एका सामाजिक कार्यकर्त्याने मंगळवारी (दि. 1) सकाळी उपोषण सुरू केले. मात्र कामाचे कार्यादेश दिल्याने व चार – पाच दिवसात रस्त्याची आखणी करण्याचे आश्वासन मुख्याधिकार्यांनी दिल्याने हे उपोषण दुपारी मागे घेण्यात आले.
एमएमआरडीएच्या माध्यमातून कर्जत नगर परिषद हद्दीतील श्रद्धा हॉटेल ते चारफाटा हा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. या कामाची निविदा नगर परिषदेकडून काढण्यात आली, मात्र कामाचे कार्यादेश काढण्यात आले नव्हते. त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी अडचण निर्माण होत होती.
हा रस्ता लवकर व्हावा, यासाठी कर्जतच्या नगरससेविका पुष्पा दगडे, नगरसेवक उमेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुलकर्णी यांनी मंगळवारी सकाळी श्रद्धा हॉटेलनजीक उपोषण सुरू केले. या वेळी माजी नगराध्यक्ष शरद लाड, माजी नगरसेवक अशोक राऊत, सीताराम कांगणे, रघुनाथ ठाकरे आदींनी पाठिंबा दिला. दुपारी तीनच्या सुमारास मुख्याधिकारी पंकज पाटील, पोलीस निरीक्षक अरुण भोर, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, अभियंता मनीष गायकवाड, सारिका कुंभार, नगररचना सहाय्यक लक्ष्मण माने, रवींद्र लाड उपोषणस्थळी आले. ’ठेकेदार कंपनीने ऑनलाइन बयाणा आणि अनामत रक्कम भरल्यामुळे त्यांना कामाचे कार्यादेश दिले आहेत तसेच चार – पाच दिवसात रस्त्याची आखणी करण्यात येईल. त्यानंतर लगेचच काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी या वेळी दिले. त्यानंतर मुख्याधिकारी पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उपोषणकर्त्यांनी शीतपेय घेऊन उपोषण मागे घेतले.