Breaking News

आयुष्य… एक न उलगडणारं कोडं चित्रमय कवितासंग्रह

एका कलेतून दुसरी कला जन्म घेते असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय गीता महल्ले-लवाळे यांच्या ‘आयुष्य… एक न उलगडणारं कोडं’ या सर्वांगसुंदर कवितासंग्रहाच्या रूपाने आपल्याला येतो. हा कवितासंग्रह चित्रकाव्य स्वरूपात आहे. एक चित्रकार म्हणून चित्र काढता काढता अंतर्मनातून शब्द स्फुरत गेले आणि ते कागदावर अलगद उतरत त्यांच्या सुंदर कविता झाल्या. त्याच कविता आणि त्यांनी रेखाटलेली चित्र असे पुस्तकस्वरूपात आपल्यासमोर आले आहे या कवितासंग्रहाच्या रूपाने.

कवयित्री गीता लवाळे यांना बालपणापासूनच चित्रकलेची आवड. चित्रकलेचे कोणतेही शास्त्रोक्त शिक्षण न घेताही त्या कॅनव्हासवर सुंदर चित्र रेखाटत, त्यात रंग भरत. ही आवड पाहूनच त्यांनी चित्रकलेचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि कलेच्या प्रांगणात प्रवेश केला. चित्र काढता काढता, त्यात रंग भरता भरता त्या शब्दांशी खेळू लागल्या, कविताही लिहू लागल्या.

आयुष्याच्या वाटेवर चालताना

ठामपणा हवाही असतो, पण…

तेथे प्रेमाचीही गरज भासतेच

असं म्हणणार्‍या गीताताईंना प्रवीण लवाळे या कलेवर निस्सीम प्रेम करणार्‍या सहृदय पतीची साथ मिळाली आणि त्यांची कला आणखी बहरू लागली, पण सर्वच आयुष्य साधे सरळ आणि सुखाने चालू राहिले, तर मजा कसली? आयुष्य म्हटलं की दुःख हे येणारच. म्हणूनच त्या वेळी कवयित्री म्हणतात,

सुख-दुःखाच्या प्रत्येक घटकेत

असतो तो आधार त्या आसवांचाच

आश्रूंची ताकद ओळखणार्‍या कवयित्री केवळ रडत न बसता त्याहीपुढे जाऊन म्हणतात,

आयुष्य रडून जगण्यापेक्षा

आयुष्य हसून फुलवत जगावं

पण कधी कधी त्या गोंधळतात, आयुष्याचं गणित त्यांना कळत नाही. मग त्या लिहितात-

शेवटी भागाकाराचं मात्र

उत्तर शून्य असतं

तसंच आयुष्यातही

शेवटी शून्यच उरत असतं

आयुष्याच्या गणिताचं उत्तर शोधून दमलेल्या कवयित्री पुढे म्हणतात,

अन् कळला जीवनाचा खेळ

कुठेच कुणाचा लागत नाही मेळ

कधी कधी त्या निराशही होतात. त्या वेळी त्यांच्या लेखणीतून शब्द उतरतात-

अवती-भवतीच्या गर्दीत

आपलं कुणीच नसतं

गर्दीत एकट्या पडलेल्या कवयित्री पुढे एका कवितेत आपले मन मोकळे करतात,

सर्वांमध्ये राहून देखील

एकटी-एकटीच रडले रे…

पण पुन्हा उभारी घेऊन त्या मनालाच विचारतात,

मी का थांबत होते?

माझे विचार नाही बोलू शकत

पण, मांडू तर शकते ना…

हळूवार नाती जपणं हीसुद्धा कवयित्रीची खासियत आहे. त्या नाती जपतात, फुलवतातही. नात्यांबद्दल लिहिताना त्या हळव्या होतात आणि म्हणतात,

कोणतंही नातं असो

अगदी नाजूक असतं…

कळीसारखं सुंदर असतं

त्याला फुलवावं लागतं…

इतकं करूनही समोरच्याकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. तेव्हा मात्र त्या निराश होऊन म्हणतात,

आपलं म्हणावं ज्याला

तेथेच घात होतो…

साथ मागावी तर म्हणतात

त्यात स्वार्थ तुझाच…

आणि मग कधी तरी त्रासूनही जातात. त्याच त्रासिकतेने शाब्दिक फटकारे मारताना त्या म्हणतात,

जा पण जाताना

तू सावरून जा त्या क्षणाला

वास्तवातल्या आयुष्याला एकदाचं

तू कायमचं संपवून जा…

अशा अवस्थेत कलाकारांना, कवी, लेखकांना मनाला उभारी देणारा वसंतही कवयित्रीला भयाण भासू लागतो. त्या वेळी त्या सहज, पण धगधगतं वास्तव मांडतात,

जमिनीसारखंच काळीज माझं

ऐन वसंतातही फाटू लागलं

अन् उन्हानं मन भाजू लागलं

मग निराश होऊन कवयित्री आपल्या कवितेत इच्छामरणाचीही इच्छा व्यक्त करतात. त्या वेळी त्या एका कवितेत म्हणतात,

प्रत्येकाचं मरण ऐच्छिक व्हावं

जेव्हा वाटेल तेव्हा मरता यावं…

वास्तवात जगणं कठीण झालं की कवयित्री कधी कधी स्वप्नांच्या दुनियेतही हरवतात. त्या आपल्या आयुष्यात खूप स्वप्न बघतात, पण तरीही त्यांना आपल्या मर्यादांची जाणीव आहे. एका ठिकाणी कवयित्री म्हणतात,

स्वप्न बघण्याला

कुठे बंधनं असतात

त्याला वास्तवात आणायला

खूप मर्यादा असतात

कवयित्रीला आयुष्य जगत असताना दुःखाची इतकी सवय झाली आहे की त्यांना येणार्‍या आठवणीही दुःखाने भरलेल्या आहेत. याबद्दल कवयित्री लिहितात,

आठवणी…

का अशाच असतात?

दुःखाने पिळलेल्या

सुखाचा दुष्काळच का?

दुःखाने भरलेल्या आयुष्यात सुखाची कल्पनाही धडकी भरवते. याच भावना कवयित्रीने पुढे दुसर्‍या एका कवितेत मांडल्या आहेत. त्या म्हणतात,

दुःखाची सवय असताना

सुखही पेलवत नाही

सुखाची कल्पनाही

देऊन जाते धास्ती

गीताताईंचा चित्रमय कवितासंग्रह अत्यंत सुंदर झालेला आहे. हा कवितासंग्रह त्यांनी आपले पती प्रवीण आणि मुलगा आरव यांना समर्पित केला आहे. या संग्रहाच्या प्रस्तावनेत कवी सतीश राऊत यांनी कवयित्रीकडून मनाला उभारी देणार्‍या काव्यांची अपेक्षा करताना, या संग्रहात असलेल्या कवितांचेही सुंदर रसग्रहण केले आहे. संग्रहाच्या मलपृष्ठावर प्रकाशिका दीपाली सोसे यांनी कवयित्रीचा थोडक्यात जीवनपट उलगडताना, त्यांचा मोठेपणाही अधोरेखित केला आहे. या संग्रहाला महसूल

राज्यमंत्री संजय राठोड यांचा शुभेच्छापर अभिप्राय लाभला आहे. संपूर्ण रंगीत चित्रांनी भरलेला आणि आर्ट पेपरवर छापलेला हा

कवितासंग्रह सर्वच बाजूंनी सुंदर आणि संग्राह्य झाला आहे. हा संग्रह काव्यरसिकांबरोबरच चित्रकलेची आवड असणार्‍या प्रत्येकाला भुरळ घालतो. चित्र पाहण्याचा आनंद घेत कविता वाचणे ही रसिकांसाठी अनोखी पर्वणी आहे. कवयित्रीचा हा पहिलाच प्रयत्न खूप सुंदर झाला आहे. यापुढेही कवयित्रीकडून सुंदर चित्रांबरोबरच आशयघन अशा कवितांची अपेक्षा आहे. शेवटी कवयित्रीच्या या ओळीने आपण समारोप करू या-

खेळता-खेळता कंटाळावं अन्

अर्ध्यावरती डाव मोडावा

त्यांच्याकडे कौतुकाने बघावं अन्

आयुष्य नव्याने जोडत राहावं

लवकरच त्यांचा दुसरा चित्रमय कवितासंग्रह आम्हाला वाचायला मिळेल, अशी अपेक्षा आणि कवयित्रीला पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा!

काव्यसंग्रह : आयुष्य… एक न

              उलगडणारं कोडं

कवयित्री : गीता महल्ले-लवाळे

(संपर्क : 9881983321)

-संदीप बोडके, कामोठे

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply