Breaking News

सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा संगम

शुक्रवारच्या पेपरमध्ये एक बातमी वाचनात आली.  गणेशोत्सवासाठी रेल्वेने दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता सीएसएमटी स्टेशनवरून 01153 क्रमांकाची गाडी सोडण्यात येणार आहे.  ही गाडी अनारक्षित आहे, असा मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर फिरला. सीएएमटी, ठाणे, दादर अशी ठिकाणी चाकरमानी कोकणात जाण्यासाठी या गाडीची वाट पाहत होते. आपले सामानसुमान, गणपतीच्या सजावटीचे, पूजेचे सारे साहित्य घेऊन कोकणी मंडळी पहाटेपासूनच गाडीच्या प्रतीक्षेत होते, पण गाडी आलीच नाही. मग हा मेसेज फेक होता असे स्पष्ट झाले. कोकणात गणेशोत्सव आणि शिमगा उत्सवाला मोठे महत्त्व आहे. या दोन्ही उत्सवांना मुंबई, पुणे अशा शहरात असणारा कोकणी माणूस गावी जाणारच. सुटी मिळत नसेल तर वेळप्रसंगी नोकरीवर लाथ मारेल पण गावाला जाईलच, पण या फेक मेसेजमुळे बाप्पाच्या स्वागताला जाणार्‍यांची पंचाईत झाली. कोकणी माणसाच्या गणपती बाप्पावरील प्रेमाचा कुणीतरी गैरफायदा घेतला. अशा लोकांना काय कळणार कोकणातील गणेशोत्सव आणि त्याचे महत्त्व?

कोकणातील गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा वैशिष्टपूर्ण घटक आहे. नोकरी उद्योगाच्या निमित्ताने मोठ्या शहरात असलेले कोकणातील मूळ रहिवासी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या मूळ गावी जात असतात.

कोकणातील तुम्हाला गणेशोत्सव कसा असतो हे अनुभवायचे असेल तर एकदा कोकणातच जायला हवे. मुंबई, मराठी माणसे आणि मराठी सण याचे एक अनोखे नाते आहे हे कुणीही नाकारत नाही, पण कोकणातील गणेशोत्सव पाहिला तर तुम्ही दरवर्षी याल. लाल मातीचा सुगंध, पारंपरिक ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, बाप्पाच्या नामाचा जयघोष आणि बेफाम होऊन थिरकणारी पावलं याची मजा काही औरच. तुमच्या डीजेलादेखील त्याची सर यायची नाही. घरोघरी होणारी आरती, रात्रभर चालणारी भजने. तौशी (काकड्या), चिबूड चोरताना उडणारी धांदल आणि मग कानावर पडणार्‍या अस्सल कोकणी मातीतल्या प्रेमळ शिव्या. सारा वेगळाचा माहोल. विसर्जनाच्या निमित्ताने नदी, ओहोळांवर होणारी गर्दी. लाडक्या गणरायाला निरोप देताना दाटून येणारे मन, पाणावलेले डोळे आणि पुढच्या वर्षी लवकर या, असा होणारा जयघोष. हिरवा शालू नेसलेल्या निसर्गाच्या साथीने भाद्रपद महिन्यामध्ये कोकणातील गणेशोत्सव आयुष्यात एकदा नक्की अनुभवा. 

सध्या मुंबई, ठाणे, पुण्यातील गणपती पाहायला अगदी परदेशातून पर्यटक येतात. राज्याच्या विविध भागातील लोक मुंबईतील गणेशोत्सव पाहण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गर्दी करतात, पण कोकणातील गणेशोत्सव केव्हा पाहिलाय? अनुभवलाय? एकदा नक्की अनुभवा. कदाचित मित्रांच्या पाहुण्यांच्या मागे लागून दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात येण्याचा हट्ट कराल. दोन दिवस सुटी मिळाल्यानंतर तुम्ही फुल टू एन्जॉय म्हणून कोकणातील समुद्र किनार्‍यांना भेटी देता. कोकणातील निसर्गसौंदर्य अनुभवता. ते क्षण भरभरून जगता. असेच काही सुवर्ण क्षण जगायचे असतील, अनुभवायचे असतील तर कोकणातील गणेशोत्सव अनुभवा.

कोकणी संस्कृती अनुभवा. फुगडी, झाकडी, नमन, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह भजनांचीदेखील मजा घ्या. अगदी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गामध्ये टप्प्याटप्प्यांनी बदलत जाणार्‍या गणेशोत्सवाची मजा काही औरच. 

गणेशोत्सवाच्या पूर्वी घरांची स्वच्छता आणि रंगरंगोटी केली जाते. कोकणात काही मूर्तिकार हाताने गणेशाची मूर्ती घडवितात. घरांमध्ये सजावट केली जाते. फुले आणि फळे यांची आरास केली जाते. गणपतीच्या स्थापनेनंतर प्रत्येक घरात आरती केली जाते. त्यानंतर गावातील समूह मिळून प्रत्येक घरात जाऊन वाद्य वाजवून भजन सादर करतात. नियोजित दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते.

झमगमती मखरे, लायटिंगचा लखलखाट, डीजेचा दणदणाट आणि महागडा नैवेद्य यापासून कोकणातला गणपती आजही काहीसा अलिप्त आहे. माळावर, परसबागेत उगवणारी फळे, फुले, पत्री, घरगुती भोजन आणि भजनाच्या सुरांवर तो समाधानी असतो. 5-10 दिवस अगदी घरचाच असल्यासारखा राहतो.

गणरायाला आणण्यासाठी बहुतके जण एकत्रच जातात. पहिल्या दिवशी पाच भाज्या आणि मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. दारातल्या केळीच्या पानावर वरण, भात, भाज्या, मोदक, कोशिंबिरीचा नैवेद्य वाढला जातो. कोणाच्याही घरातील आरती असो, वाडीत राहणारे सगळे हजर असतात. टाळ-टाळ्यांच्या गजरात आरती होते. वातावरण एवढे शांत असते की कोणाच्या घरात आरती सुरू आहे हे आपल्या घरात बसून अचूक ओळखता येते.

प्रत्येकाच्या घरी एकदा तरी भजनी मंडळ आमंत्रित केले जाते. कधी गावातील तर कधी आजूबाजूच्या गावांतील भजनी मंडळांना सुपार्‍या दिल्या जातात. जाकडीच्या बार्‍या होतील. टाळ-मृदंगाच्या ताला-सुरांत सर्व जण मग्न होतात.

विसर्जन सोहळा प्रेक्षणीय असतो. यातही क्रमाने एकेकाच्या घरी पूजा, आरती होते. घरादाराच्या भरभराटीसाठी, सुखशांती, लग्नकार्यासाठी, संततीसाठी गणरायाला साकडे घातले जाते. तो आपली इच्छा पूर्ण करेल असा गाढ विश्वास त्यात असतो. वाडीतील सगळे गणपती एकाच वेळी घराबाहेर पडतात. लाडक्या गणरायांना डोक्यावरील पाटावर बसवून नदीकडे नेले जाते. नेताना गणपतीचा चेहरा मात्र घराच्या दिशेने असतो. त्याची कृपादृष्टी घरावर राहावी अशी त्यामागची श्रद्धा. नदीकाठी सर्व मूर्ती रांगेत मांडल्या जातात. पुन्हा आरती होते. निरांजने लागतात, अगरबत्त्या दरवळतात. गूळ, खोबरे, फळे, काकड्यांचा नैवेद्य वाटला जातो आणि एवढे दिवस ज्याच्यामुळे घर गजबजून गेलेले असते त्या गणरायाला निरोप दिला जातो.

इथल्या गौरीही निसर्गाशी नाते सांगतात. इथे खड्याच्या गौरी पूजल्या जातात. नदी किंवा विहिरीजवळचे दगड घेऊन त्यांची गौरी म्हणून पूजा केली जाते. बांबूची रोवळी घेऊन त्यात थोडे तांदूळ पसरवले जातात. हरणे, तेरडा, आघाडा, एखादी पालेभाजी आणि हळद अशा सगळ्या वनस्पतींची रोपे घेऊन ती दोर्‍याने बांधून रोवळीत ठेवली जातात. ही रोवळी विहिरीवर किंवा नदीवर नेऊन त्यात तिथलेच खडे ठेवून त्यांची पूजा केली जाते. घरातील जी महिला गौरीची पूजा करून तिला घरी आणणार असते, तिच्याशी गौरी घरी येईपर्यंत कोणीही बोलत नाही. ती अतिशय शांतपणे पूजा करून गौरी घरी आणते. गौरी आगमन, पूजन आणि विसर्जन असे तीन भाग असतात. काही वेळा हे तिन्ही विधी तिथीनुसार तीन स्वतंत्र दिवशी असतात, तर काही वेळा आगमन आणि पूजन एकाच दिवशी असते. पूजनाच्या दिवशी ओवसे भरले जातात. यात सुपांमध्ये सुकामेवा, फळे भरून पतीला आणि जवळपासच्या महिलांना ही सुपे दिली जातात. ओवसा दिल्यानंतर पती एखादी भेटवस्तू किंवा पैसे त्यावर ठेवतो. या दिवशी गौरीसाठी पाच भाज्यांचा नैवेद्य केला जातो. त्यात काही रानभाज्यांचाही समावेश असतो. गौरीच्या पूजेत वापरल्या जाणार्‍या पत्री, नैवेद्यातील भाज्या सगळ्यातच वापरली जाणारी पाने औषधी गुणधर्माची असतात. अवाजवी सजावट आणि महागड्या नैवेद्यांपासून कोकणातील गौरी आजही दूर आहेत हे विशेष.

-योगेश बांडागळे

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply