नागरिक आणि आदिवासी बांधवांनी केले श्रमदान
कर्जत : बातमीदार
ब्रिटीश काळापासून माथेरानचे प्रवेशद्वार ठरलेल्या व पूर्वीचा रहदारीचा रामबाग पॉईंट ते चौक हा मुख्य रस्ता नामशेष होण्याच्या मार्गावर होता. या रस्त्याला पुनर्जिवन देण्याकरिता माथेरानकर नागरिक व पंचक्रोशीतील आदिवासी बांधव बुधवारी (13 फेब्रुवारी) रामबाग पॉईंट येथे श्रमदानासाठी एकवटले होते.
माथेरान या थंड हवेच्या पर्यटनस्थळी जाण्यासाठी सध्या अस्तिवात असलेला नेरळ – माथेरान घाट रस्ता 1974 साली श्रमदानातून साकारला गेला. तर 1907 साली नॅरोगेज रेल्व मार्ग उभारला गेला. पंरतु 2005 सालच्या आपतकालीन परिस्थितीचा विचार करुन माथेरान-धोदाणी या पर्यायी रस्त्यासाठी 19 नोव्हेंबर 2008 रोजी माथेरानकरांनी सलग पाच दिवस श्रमदान केले होते. एव्हढे कष्ट घेऊनही पर्यावरणाच्या जाचक अटींमध्ये हा रस्ता अडकल्याने माथेरानकरांच्या पदरी निराशा पडली होती.
दरम्यान, माथेरानला जाण्यासाठी सगळ्यात जुना रामबाग पॉईंट रस्ता नामशेष होण्याच्या मार्गावर होता. त्याला गतवैभव प्राप्त व्हावे, म्हणून नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी पुढाकार घेतला. यावेळी प्रेरणा सावंत तसेच मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी हेरीटेज कमिटी व रायगडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे रामबाग रस्त्या संदर्भात योग्य पाठपुरावा केला. त्यामुळे सदर रस्ता हेरीटेज वॉक करण्यासाठी हेरीटेज कमिटीची परवानगी मिळाली. बुधवारी माथेरानकरांनी श्रमदानास सुरुवात केली. त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, मुख्याधिकारी रामदास कोकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम, रिक्षा संघटनेचे शकील पटेल, शहरप्रमुख चंद्रकात चौधरी यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.