Breaking News

हेच अमुचे मागणे!

महागाई, न्यायालयाची बंधने, परवानग्या, महामार्गावरील वाहतूक कोंडी अशी अनेक विघ्नं पार करीत आज आपल्या लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन होत आहे. सारी दुःखे, सारी संकटे विसरून आता सारे बाप्पाचे स्वागत करतील. गणरायाची श्रध्दापूर्वक सेवा करतील. गणपती बाप्पा सर्वकाही जाणतो, त्याच्याकडे आम्ही पामरांनी काय मागावे? पण हे गणराया पूरग्रस्तांना उभं राहण्याचं, सावरण्याचं बळ दे, तुझ्या दर्शनासाठी येणार्‍या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडू दे, बळीराजाच्या शेतात सोनं उगवू दे, हेच अमुचे तुझ्याकडे मागणे आहे.

बिहारची छटपूजा, बंगालींची दुर्गापूजा, केरळचा ओणम, पंजाबची बैसाखी, गोव्याची ख्रिस्त जयंती, कर्नाटकचा दसरा तसा महाराष्ट्राचा उत्सव कोणता तर गणेशोत्सव. आजपासून या उत्सवाला सुरुवात होत आहे. बाजारपेठा गजबजल्या आहेत.  रस्ते भरून गेले आहेत. सारे वातावरण भक्तीमय झाले आहे. ब्रिटिशांच्या सार्वभौम वसातहतवादाच्या विरोधात देशवासीयांना एकत्र आणण्यासाठी शिवजयंती आणि गणेशोत्सवाचा सोहळा साजरा करण्याची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातच रोवली गेली. या उत्सवांना सार्वजनिक स्वरूप देऊन त्यांना तत्कालीन हिंदुस्थानातल्या कराचीपासून कोलकात्यापर्यंतची राष्ट्रीय लोकप्रियता मिळवून देण्याचे कार्य निःसंशयपणे लोकमान्यांचेच. या गणेशोत्सवालाही दोन वर्षांपूर्वी सव्वाशे वर्षे पूर्ण झाली. सव्वाशे वर्षांच्या दीर्घ काळात आता केवळ महाराष्ट्र, देशच नव्हे तर जगाच्या पाठीवर जिथे जिथे मराठी माणूस पोचला त्या त्या ठिकाणी गणेशोत्सव पोहोचला आहे. बुद्धी-शक्तीची गणेश देवता अफगाणिस्तानापासून कंबोडिया-इंडोनेशियापर्यंत सर्वत्र आढळते, पण सार्वजनिक गणेशोत्सव अजूनही खर्‍या अर्थाने मराठी मनाचा उत्सव होय, तर घरोघरी गणरायांना आणण्याची परंपरा आजही तितक्यात श्रध्देने, भक्तीभावाने जपली गेली आहे. सारे भक्त गणरायाला आज घरी आणतील. त्याची यथासांग पूजा करतील. वर्षभरातल्या सार्‍या व्यथा बाप्पाला सांगतील. पुढल्या वर्षीपर्यंत सुखात ठेव, असे आग्रहाने सांगतील. आमचेही बाप्पाकडे मागणे आहे. बाप्पा महाराष्ट्राच्या अर्ध्याहून अधिक भागात यंदा महापूर आला. सारे होत्याचे नव्हते झाले. अनेकांचे बळी गेले, काहींचे संसार वाहून गेले. या सार्‍यांना बाप्पा जगण्याचे बळ दे, त्यांना सावरण्याचे बळ दे. पाऊस अजूनही कोसळत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पावसाला म्हणावा आता जरा वेग कमी कर. बळीराजाची शेती बहरू दे, त्याच्या शेतात सोनं पिकू दे आणि हो बाप्पा तुझ्या आगमनाबरोबर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. ही निवडणूक शांततेत पार पडू दे. निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडू दे, विजयी उमेदवारांच्या आनंदाचा गुलाल उधळू दे, पण ही सारी निवडणूक प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडू दे. बाप्पा येतोस तर एक काम नक्की कर. त्या पाकिस्तानला शेजारधर्म पाळायची बुध्दी दे. काश्मीरमधील 370 कलम हटविल्यामुळे ते जरा जास्तच नाराज झाले आहेत. त्यांना सांग ना, काश्मीर त्यांचे होतेच कुठे? आता कशाला उगाच त्रागा करून घेताय. बाकी काही बाप्पा तुझ्याकडे मागत नाही. तुझ्या सेवेसाठी येणार्‍या चाकरमान्यांना सुखाने गावी आण आणि पुन्हा आपापल्या कामाच्या ठिकाणी सुखी ठेव. अजून काही मागणे नाही. सर्वांच्या मनातील सर्वच इच्छा पूर्ण कर म्हणजे झाले.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply