Breaking News

स्काय इज द लिमिट!

अवघड खेळपट्टीवर तेही प्रतिकूल परिस्थितीत एखादा फलंदाज जेव्हा नेत्रदीपक फटकेबाजी करतो तेव्हा तो दर्शकांची वाहवा मिळवतो. आपल्या संघाची आशा असणारा हा खेळाडू त्याच्या नियोजनबद्ध खेळीने विजयाला गवसणी घालणार असे वाटत असताना शेवटच्या क्षणी तो दुर्दैवीरीत्या बाद होतो… असाच काहीसा प्रकार भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या चांद्रयान-2 बाबतीत घडला आहे. भारताच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील या यानाने खडतर टप्पे पार केल्यानंतर ते चंद्रावर उतरणार इतक्यात निर्णायक वेळी विक्रम लँडरचा संपर्क तुटला आणि कोट्यवधी देशवासीयांच्या जणू काळजाचा ठोका चुकला.

विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. विज्ञानाच्या जोरावर मानवी जीवन सुसह्य होण्यास हातभार लागला. पृथ्वीवर अनेक शोध लावल्यानंतर अवकाशात काय काय दडलेय याचाही वेध जगभरातील शास्त्रज्ञांनी घेतला. अगदी 50 वर्षांपूर्वी अमेरिकेचे नील आर्मस्ट्राँग व एल्विन ऑल्ड्रिन यांच्या रूपात मानवाने चंद्रावर पाऊल टाकले. वैज्ञानिक आविष्कारामध्ये आपल्या भारताचे योगदानदेखील मोलाचे राहिले आहे. शून्याचा शोध लावणारे भास्कराचार्य, नोबेल पुरस्कार प्राप्त सी. व्ही. रमण, भारताच्या अणूविज्ञान कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी जहांगीर भाभा, परम महासंगणक तयार करणारे डॉ. विजय भटकर, ‘मिसाईल मॅन’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांसारख्या महान शास्त्रज्ञांनी देदीप्यमान कामगिरीतून स्वत:सह देशाचे नाव जगात रोशन केले. इस्रो संस्था अंतराळातील अनेक गोष्टींचा उलगडा करण्यासाठी नेटाने कार्यरत आहे.

‘इस्रो’ने आजवर अनेक मोहिमा यशस्वी केल्या आहेत. यंदाच या संस्थेने आपल्या एमीसॅट उपग्रहासह इतर देशांचे 28 नॅनो उपग्रह श्रीहरिकोटा येथील अवकाशतळावरून पीएसएलव्ही सी 45 प्रक्षेपकाच्या सहाय्याने प्रक्षेपित केले. विशेष म्हणजे यात अमेरिकेतील 24, लिथुआनियातील 11 आणि स्पेन व स्वित्झर्लंडच्या प्रत्येकी एका उपग्रहाचा समावेश होता. यापूर्वीही ‘इस्रो’ने अनेक उपग्रहांचे एकाच वेळी प्रक्षेपण करण्याची किमया साधली आहे. त्याही पुढे जाऊन चंद्रावर यान सोडण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम भारताने हाती घेतली. आजवर अमेरिका, रशिया आणि चीन या जगातील केवळ तीनच देशांना अशी कामगिरी यशस्वीरीत्या बजावता आली आहे.

आपल्या देशाचे तत्कालीन पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी 15 ऑगस्ट 2003 रोजी चांद्रयान मोहिमेची घोषणा केली होती. ऑक्टोबर 2008मध्ये या मानवरहित यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे यान दोन वर्षे कार्यरत राहण्याची अपेक्षा होती, मात्र तांत्रिक बिघाडामुळे चंद्रावर पोहचण्यापूर्वीच 312 दिवसांनंतर वैज्ञानिकांचा या यानाशी संपर्क तुटला, पण हार मानतील ते ‘इस्रो’चे शास्त्रज्ञ कसले. 2007मध्ये रशियाची अंतराळ संस्था रॉसकॉसमस आणि इस्रो यांच्यामध्ये चांद्रयान-2 मोहिमेवर एकत्र काम करण्यासंबंधी करार झाला. त्यानुसार रशिया भारताला तंत्रज्ञानासोबतच लँडरसंदर्भात अधिक माहिती पुरविणार होती. त्यासाठी बैठक झाली. चांद्रयान-2च्या रचनेला अंतिम रूपही दिले गेले, पण रशियाने नंतर मात्र लँडर देण्यासाठी असमर्थता दाखविली. मग 2016मध्ये भारतीय वैज्ञानिकांनी स्वतःहून मोहिमेची आखणी करून मोहीम राबविण्याचे ठरवले. यानंतरचे टप्पे सर्वांना माहीत आहेत.

पहिल्यांदा सर्व काही जमून न आल्याने तात्पुरते रद्द झालेले चांद्रयान-2 हे 22 जुलै रोजी चंद्राच्या दिशेने झेपावले. ते संपूर्ण स्वदेशी बनावटीने साकारले गेले होते. विशेष म्हणजे मळलेल्या वाटेने न जाता चंद्राच्या दक्षिण धु्रवावर यान उतरविण्याचा ‘इस्रो’चा मनसुबा होता. पहिल्या चांद्रयान मोहिमेत पाण्याचे रेणू सापडले होते. त्यामुळे या मोहिमेत चंद्रावर क्षार, पाणी आहे का? कोणते वायू आहेत का? तेथे जीवसृष्टीची शक्यता आहे का? हे पडताळले जाणार होते, परंतु ते इतके सोपे नव्हते. हे ठावूक असूनही वेगळे काहीतरी जगासमोर आणण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञ गेली काही वर्षे झपाटल्यासारखे काम करीत होते.

या यानाने पृथ्वीच्या सर्व कक्षा ओलांडून ते चंद्राच्या कक्षेत दाखल झाल्यावर तेथील छायाचित्रे ‘इस्रो’ने जारी केली. ठरविल्याप्रमाणे बहुतांश टप्पे पूर्णत्वास आले. आता विक्रम लँडर प्रज्ञान या रोव्हरला घेऊन शनिवारी मध्यरात्री चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार हा शेवटचा टप्पा बाकी असताना चंद्रापासून अवघ्या 2.1 किमी अंतरावर असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला आणि भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेला धक्का बसला. आता नेमका काय बिघाड झाला याची कारणमिमांसा ‘इस्रो’चे शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी करतील. त्यातून काय उणीव राहिली हे समोर येईलच, पण मानवरहित यान तेही लाखो किमी अंतरावरून संगणकाच्या सहाय्याने नियंत्रित करणे सोपे नाही. या दुसर्‍या मोहिमेत पहिल्यापेक्षा अधिक प्रगती आपल्या देशाने केली हे नाकारता येणार नाही, शिवाय चांद्रयान-2चा ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत राहणार आहे. हेही नसे थोडके!

इस्रायलची चांद्रमोहीम अशीच फसली होती. अवकाशयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास काही क्षण राहिले असतानाच या चांद्रयानात बिघाड झाला. चीन आणि रशियाप्रमाणे अमेरिकेच्याही काही चांद्रमोहिमा फसल्या होत्या. असे असले तरी अपयश ही यशाची पहिली पायरी ठरते. ‘इस्रो’च्या मदतीने भारताने अंतरिक्षात एकाचवेळी अनेक उपग्रह सोडण्याचे, तसेच उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र डागण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. त्या अर्थाने उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या तंत्रज्ञानात भारताला जगमान्यता मिळाली आहे. राहिला विषय चांद्रयानाचा, तर आज ना उद्या ‘इस्रो’चे शास्त्रज्ञ चंद्राला आपल्या कवेत नक्की घेतील. स्काय इज द लिमिट!

पंतप्रधानांचे महत्त्वपूर्ण पाऊल

भारताचे चांद्रयान-2 शनिवारी मध्यरात्री चंद्राकडे झेपावत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: ‘इस्रो’च्या बंगळुरू येथील मुख्यालयात उपस्थित होते. खरंतर या संपूर्ण मोहिमेवर ते पहिल्यापासून लक्ष ठेवून होते. शेवटचा टप्पा आल्यावर शास्त्रज्ञांचे कौतुक करण्यासाठी ते स्वत: आले, मात्र विक्रम लँडरचा संपर्क तुटल्याने ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांसह तमाम देशवासीयांची निराशा झाली. पंतप्रधान मोदी याही स्थितीत अविचल राहिले. त्यांनी शास्त्रज्ञांचे कौतुक करून हिंमत न हारण्याचे आवाहन केले. एवढेच नव्हे तर ’इस्रो’चे प्रमुख के. सिवन यांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्यावर मोदींनी त्यांना मिठी मारली व धीर दिला. याला म्हणतात नेता. यशाचे श्रेय घेणारे अनेक असतात, पण अपयशाला भविष्यातील यशाकडे घेऊन जाण्यासाठी शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देणारे मोदी विरळेच म्हणावे लागतील.

हॅट्स ऑफ टू ’इस्रो’ अ‍ॅण्ड पीएम मोदी!

-समाधान पाटील (मो. क्र. 9004175065)

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply