Breaking News

पायाभूत सुविधांवर 100 लाख कोटी खर्च करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती; मुंबईत मेट्रो मार्गिकांचे भूमिपूजन

मुंबई : प्रतिनिधी

आजच्या घडीला देश पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना आपल्या शहरांची निर्मितीही 21व्या शतकातील जगाप्रमाणे करावी लागणार आहे. याच विचारासह आपले सरकार पुढील पाच वर्षांत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरवर 100 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 7) येथे दिली. मुंबईतील तीन नव्या मेट्रो मार्गिकांच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते.

मुंबईत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघ टिळक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी मेट्रोच्या तीन मार्गिकांचे भूमिपूजन केले. गायमुख-शिवाजी चौक (मिरा रोड) मेट्रो 10 (9.2 किलोमीटर), वडाळा-सीएसटी मेट्रो 11 (12.8 किलोमीटर) आणि कल्याण-तळोजा मेट्रो 12 (20.7) या प्रकल्पांचा समावेश आहे. या वेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोच्या स्वदेशी कोचचे अनावरण आणि बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचे उद्घाटन रिमोटद्वारे करण्यात आले.

या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, राज्याचे मंत्री विनोद तावडे, अ‍ॅड. आशिष शेलार आदी उपस्थित होते.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. एवढेच नव्हे तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्यपाल कोश्यारी यांचेही कौतुक केले. या वेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख लहान भाऊ असा केला.

गणेश विसर्जनाच्या वेळी जलप्रदूषण रोखा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी गणेशभक्तांना केले. ‘बाप्पाला निरोप देताना खूप सारे प्लास्टिक आणि इतर कचरा समुद्रात फेकला जातो. यंदा हा प्रयत्न करू या की असे कोणतेही सामान समुद्रात जाणार नाही, ज्यामुळे जलप्रदूषण वाढीस लागेल,’ असे मोदींनी सूचित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘महाराष्ट्राच्या वतीने तुमचे आभार मानतो. देशापासून काश्मीरला वेगळे करण्याचा काही जण प्रयत्न करीत होते, पण तुम्ही कलम 370 रद्द करून त्यांना रोखले. काश्मीर व श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावलात. तुमच्या नेतृत्वात चाँद जिंकला. आता केवळ औपचारिकता शिल्लक आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात युतीचेच मजबूत सरकार पुन्हा येणार आहे. आम्हाला सत्तेची हाव नाही, मात्र विकास करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे.

उद्धव ठाकरेंकडून मोदींचे कौतुक

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. ‘सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे झाली. देशाला दिशा दाखवणारे मोदींचे नेतृत्व आहे. मोदीजी, तुम्ही अयोध्येत राम मंदिर बांधाल हा विश्वास आहेच, शिवाय समान नागरी कायदादेखील तुम्ही आणाल असादेखील विश्वास असल्याचे ठाकरे म्हणाले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply