कर्जत : बातमीदार
येथील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट दिसून येत आहे. या कार्यालयाच्या गेटवरच नाहीतर परिसरात आणि काही कुत्रे कार्यालयाच्या पायर्यांवरही दिसून येत आहेत. त्याबद्दल कर्जत पंचायत समितीचे प्रशासन काय करतेय, अशी विचारणा होत आहे.
कर्जत पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांना या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत असल्याने, त्यावर वेळीच नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. पंचायत समिती कार्यालय परिसरात या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
कर्जत पंचायत समिती कार्यालयाच्या मैदानात डझनभर कुत्री भटकत असतात तसेच जागोजागी बसलेले, झोपलेले असतात. कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तसेच मैदानात ये-जा करणार्या नागरिकांच्या अंगावर ही भटकी कुत्री धावून जातात. अनेकदा या कुत्र्यांच्या हल्ल्यात काही जण जखमीदेखील झाले असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.