Breaking News

नवी मुंबईत कोरोनामुक्तीचा दर घसरला; एप्रिलमध्ये रुग्णवाढ कायम

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबईत कोरोना रुग्णांत सातत्याने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यात आणखी भर म्हणजे कोरोनामुक्तीचा दर हा 96 टक्क्यांवरून 84 टक्क्यांवर घसरला आहे. गेल्या 14 दिवसांत दररोज कोरोनाबाधित होणार्‍यांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणार्‍यांचे प्रमाणही कमी आहे. एप्रिल महिन्यात नव्या रुग्णांची संख्या 14,285 वाढली, तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या फक्त 8948 आहे. फेब्रुवारीच्या अखेरपासून रुग्णसंख्या वाढू लागली असतानाही फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांत 94 टक्क्यांच्या आसपास कोरोनामुक्तीचे प्रमाण होते, परंतु एप्रिलमध्ये या प्रमाणात लक्षणीय घसरण झाली आहे. एप्रिल महिन्यात सातत्याने नवे रुग्ण एक हजाराच्यावर येत आहेत. 4 एप्रिल रोजी आजवरची सर्वाधिक 1441 इतकी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना कोरोनातून बरे होणार्‍यांचा वेग मात्र मंदावला आहे. कोरोनामुळे मृत झालेल्यांमध्ये 50 वयोगटावरील रुग्ण अधिक आहेत. त्यामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याची आवश्यकता जास्त आहे. तर नवे कोरोनाग्रस्त हे 20 ते 40 वयोगटातील अधिक आहेत. पालिकेकडून उपचार राबवण्यात येत आहेत, मात्र कोरोनाचा प्रकार बदलल्यामुळे रुग्णांना बरे होण्यास विलंब लागतो. दोन दिवसांपासून बरे होणार्‍यांचे प्रमाण वाढत आहे. तरीही नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे, असे मत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केले.

केवळ 43 अतिदक्षता खाटा शिल्लक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबईतील रुग्णांची संख्या कमी अधिक प्रमाणात वाढत आहे. शहरात घरातच अलगीकरण असलेल्या रुग्णांची संख्या अकरा हजारांच्या घरात गेली आहे. प्रत्यक्षात साडेतीन हजार रुग्ण उपचार घेत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येसाठी खासगी व पालिकेचे 504 रुग्णशय्या या अत्यवस्थ रुग्णांसाठी असून यातील केवळ 43 रुग्णशय्या शिल्लक आहेत. विशेष सुविधा असलेल्या रुग्णालयातील अत्यवस्थ रुग्णशय्या तर व्यापून गेलेल्या आहेत. त्यामुळे शहरातील छोट्या मोठ्या रुग्णालयात 50 पर्यंत रुग्णशय्या शिल्लक आहेत. या अतिदक्षता रुग्णशय्यानंतर प्राणवायू आवश्यक असलेल्या रुग्णशय्याची आवश्यकता भासत आहे. पालिकेने खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून 174 रुग्णशय्यांची तयारी केलेली आहे. यातील 39 रुग्णशय्या आजच्या घडीला शिल्लक आहेत. ऑक्सिजनसह असलेल्या रुग्णशय्या या एक हजार 530 असून यातील 224 शिल्लक आहेत, तर ऑक्सिजन पुरवठा नसलेले साध्या रुग्णशय्यादेखील चार हजार 441 आहेत. यातील अडीच हजार रुग्णशय्या खाली असून पनवेलमधील इंडिया बुल्स या इमारतीतदेखील एक हजारपर्यंत रुग्णशय्या अलगीकरणासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply