मुंबई : प्रतिनिधी
कोरोना काळात राज्यातील वीज ग्राहकांना भरमसाठ बिले आलीत. कोणीही बिल माफ करण्यासाठी सरकारकडे गेले नव्हते. उलट सरकारनेच 100 युनिटपर्यंत वीज बिल माफीची घोषणा केली. आता मात्र हात झटकत ग्राहकांना नोटिसा पाठविल्या जात आहेत. आतापर्यंतच्या राज्याच्या इतिहासात असे कधी झाले नाही, असा आरोप करीत भारतीय जनता पक्ष महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार आहे, अशी माहिती भाजप नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोनाच्या संकटकाळात सहा-सहा महिने मीटर रीडिंग करण्याकरिता कोणी गेले नव्हते. मग त्यानंतर भरमसाठ बिले आली. आता 72 लाख लोकांना वीजजोडणी तोडण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे, असे बावनकुळे म्हणाले. शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांची वीज बिले भरण्याची क्षमता नाही. 72 लाख कुटुंबीयांचे वीज कनेक्शन तोडणे म्हणजे 4.5 कोटी लोकांना फटका बसणार आहे. याविरोधात आंदोलन करून 5 फेब्रुवारीला तालुका स्तरावर महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार आहोत. जर कोणी वीज कनेक्शन तोडायला आले, तर भाजपचे कार्यकर्ते हे करू देणार नाहीत, असा इशारा बावनकुळे यांनी दिला. आमच्या काळात कुठेही आणि कोणाचेही वीज कनेक्शन तोडलेले नाही, उलट जी कनेक्शन बाकी होती ती दिली, असे सांगून महाविकास आघाडी सरकारला 12 महिने झाले. त्यांनी श्वेतपत्रिका काढून कंपन्यांची परिस्थिती स्पष्ट करावी, असेही बावनकुळे म्हणाले.