चाकरमान्यांचा परतीचा प्रवास बिकट
माणगाव : प्रतिनिधी
कोकणवासीयांचे आराध्य दैवत गणपतीला शनिवारी भावपूर्ण निरोप दिल्यानंतर आपल्या मायभूमीतून कर्मभ्ाूमीकडे निघालेल्या चाकरमान्यांना पुन्हा एकदा परतीच्या प्रवासात मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव ते लोणेरे दरम्यान वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे चाकरमानी प्रवासी तासन्तास या महामार्गावर सकाळपासूनच वाहतूक कोंडीला तोंड देत होते. त्यामुळे चाकरमान्यांच्या वाट्याला वाहतूक कोंडीचे विघ्न आडवे आले. या महामार्गावर वाहतूक पोलीस, रायगड पोलीस अधिकारी, तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले असले, तरी पोलिसांची या वाहतूक कोंडीने झोप उडाली आहे.
रायगड पोलिसांनी गणेशोत्सवाच्या काळात माणगावात दरवर्षी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग काढून, तसेच माणगावात दुभाजक बसवून रंगीत तालीम केली होती, मात्र जे व्हायचे तेच अखेर घडले. माणगावात चाकरमानी गणेशभक्तांना मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. तासन्तास चाकरमान्यांना रस्त्यावरच अडकून पडावे लागले. रायगड पोलिसांनी इंदापूर, माणगाव, लोणेरे येथे पोलीस, वाहतूक पोलीस, होमगार्ड, तसेच दंगलकाबू नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. त्याचबरोबर अतिरिक्त पोलीस कर्मचारी व अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले असले, तरी इंदापूर, माणगाव, लोणेरे भागात अखेर वाहतूक कोंडीचे विघ्न गणेश भक्तांच्या आड आले.
कोकणातून मुंबईकडे जाणार्या चाकरमानी प्रवाशांना महाड येथील पाचाडमार्गे बोरवाडी निजामपूर, तसेच माणगाव तालुक्यातील ढालघर फाटा येथून बोरवाडी निजामपूरमार्गे कोलाड व खोपोलीकडे वाहने पर्यायी मार्गाने पाठविण्यात आले. सकाळपासूनच इंदापूर, माणगाव, लोणेरे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगाच्या रांगा उभ्या होत्या. या वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले. त्यामुळे आपल्या नियोजित कामावर अनेक चाकरमान्यांना वेळेवर पोहोचता आले नाही. माणगाव बाजारपेठेतील वाहतुकीची कोंडी ही चाकरमान्यांना नेहमीची डोकेदुखी ठरत आहे.