नागोठणे : प्रतिनिधी
रोहे तालुक्यातील बाळसई गावचे शेतकरी वसंत भोसले यांनी शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जपून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले वसंत भोसले हे गेली 25 वर्षे गावातील विविध कार्यक्रमांत मोफत जेवण आणि शेतात राबून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देतात.
गेली 10 वर्ष ते आपल्या शेतात जे काही धान्य पिकवतात, ते विकून ऐनघर विभागातील ऐनघर, सुकेळी, कानसई, बाळसई, पाटणसई या आदिवासी पाड्यांवर असलेल्या शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देतात. जेव्हा मी 25 वर्षांचा होतो तेव्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध नव्हत्या. त्या वेळेस मी माझा उदरनिर्वाह शेतीतून करायला सुरुवात केली. माझ्या पाच मुलांचे शिक्षण करण्यासाठी नातेवाईक आर्थिक मदत करत होते, तसेच शेतात पिकणारे धान्य विकून मुलांना शिक्षण दिले. त्या वेळी भरपूर त्रास सहन करावा लागला होता. आज बाळसई गावसह परिसरातील अन्य गावे व वाड्याच्या ठिकाणी आदिवासी मुलांना शिक्षणापासून वंचित राहिलेले पाहावेसे वाटत नाही. आज माझे वय 65 वर्ष आहे, पण आमच्या काळात असलेल्या गरिबीचे हेलकावे आताच्या पिढीला सहन होत नसतात. अशा मुलांनी वाम मार्गाला जाऊ नये व या वंचित मुलांनी शिक्षण घ्यायला पाहिजे, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी हे चांगले कार्य करीत आहे, असे वसंत भोसले म्हणाले.